नवी दिल्ली: गोव्याचे मंत्री विश्वजित राणेंची ऑडिओ टेप जारी करत काँग्रेसने दावा केला की रफाल कराराच्या फायली माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरांकडे आहेत. राहुल गांधींनी हा गंभीर आरोप करत मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. गोव्याचे मंत्री फोनवर म्हणतात. रफालच्या फायली बेडरूममध्ये असल्याचे मुख्यमंत्री पर्रीकरांनी कॅबिनेट बैठकीत सांगितले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, पर्रीकर या फायलींच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना ब्लॅकमेल करत आहेत. संसदेत ऑडिओ टेप वाजवण्याच्या राहुल यांच्या मागणीवर सभापती सुमित्रा महाजन म्हणाल्या, टेपच्या सत्यतेची हमी दिली तरच ते संभाषण वाचून ऐकवू शकतात. राहुल म्हणाले, पंतप्रधानांनी आपले प्रिय मित्र अनिल अंबानीवर ३० हजार कोटी रुपये उडवले. सभापतींनी नाव घेण्यास मज्जाव कल्यानंतर त्यांनी AA शब्द उच्चारून अंबानींचा उल्लेख केला. अरुण जेटलींनी Q च्या माध्यमातून बोफोर्स घोटाळ्यातील दलाल क्वात्रोचीचा उल्लेख करत म्हटले की, जेव्हा घोटाळा होत होता तेव्हा राहुल Qच्या कडेवर खेळत होते का? जेटलींनी चौकशीसाठी जेपीसीची मागणीही फेटाळली.








