डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा असलेल्या दुबईतील ग्रंथालयाला रामदास आठवले यांनी दिली भेट.. 

348

मुंबई दि. 21- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण ग्रंथसंपदा आणि भारताचे संविधान असलेल्या दुबईतील मोहम्मद बीन राशीद ग्रंथालयाला (लायब्ररी) ला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज भेट दिली.

या ग्रंथालयात 6 लाखांहुन अधिक ग्रंथ आहेत. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखन आणि भाषणाच्या सर्व खंडाच्या ग्रंथांचा आणि भारतीय संविधान ग्रंथाचा मोहम्मद बीन राशीद या लायब्ररीत समावेश केल्याबद्दल संयुक्त अरब अमिरात (युएई) सरकारचे रामदास आठवले यांनी आभार मानले आहेत.

मोहम्मद बीन राशीद ग्रंथालयाची सुरुवात मागील वर्षी दुबईत करण्यात आली. या ग्रंथालयाचे अध्यक्ष संयुक्त अरब अमिरातीचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बीन राशीद अल मख्तुम हे आहेत. हे ग्रंथालय एक आदर्श ग्रंथालय ठरले आहे. दुबईतील भारतीयांनी सुध्दा या ग्रंथालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर हे ग्रंथप्रेमी होते. ग्रंथ आणि ग्रंथालयाशी डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे जवळचे नाते होते. डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेवुन आपली पावले ग्रंथालयाकडे वळली पाहिजेत. ग्रंथ आणि पुस्तकांशी मैत्री जुळली पाहिजे. वाचनाची आवड युवा पिढीत निर्माण केली पाहिजे असे आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केले.