एकीनं जगाल तर जगाल, नाही तर बेकीनं मराल…

49

संध्याकाळच्या कातरवेळी चैत्यभूमीकडे गेलो तेव्हा एक अद्भूत घटना घडली, तो प्रसंग. तसा तो म्हातारा. मी त्याच्या शेजारी कठडयावरच निवांत बसलो. त्याचे नाव कळले. बुधराम रतिराम धूरिया. हातात फूलमाळा घेवून बसलेला. मी म्हणालो- काय सहजच ? नाही. मी बाबांच्या दर्शनासाठी आलो होतो। मग ? दरवाजा बंद। रात्र फार झाली। मी म्हणालो- सकाळी यायचत्. अलिकडे पोलीस पहारा आहे. घात होण्याची शक्यता असल्याने कधी कुलूप बंद बंदोबस्त असतो. फार दिवसाने आलेले दिसताय ? तशी जवळ-जवळ 56 वर्षे झाली म्हणा-ना. मग त्यांनी आपली कहानी सांगायला सुरुवात केली. डॉ. बाबासाहेबांच्या शेवटच्या श्वासानंतर तो त्यांच्या अर्थी बरोबरच मुंबईत आला होता. बाबांना निरोप देण्यासाठी लाखो-लाखो लोक 6 डिसेंबरला याच चौपाटीवर लोटले होते. अमर्याद जनसमुद्र शोकाने उचंबळून हेलावणारा. त्यात तो हजर होता.

ज्वाला धगधगल्या, सरण पेटू लागले. अश्रू अनावर झाले. सारा आसमंत आक्रोशाने भरुन गेला. बाबा-बाबा, आम्हाला कसे हो सोडून गेलात? आता आम्हाला कोण पाहणार ? बाबा आता आम्हाला दुसरे कोण आहे हो ? बाबा. सर्वत्र काळीज चरचरा कापून टाकणारे, चित्कार आणि हंबरडा फोडून टाकणारे टाहो ? नेत्यांनीही त्यावेळी टाहो फोडला. बाबा तुमच्या आदेशा प्रमाणे वागू, तुमचे उरलेले काम हमखास करु, हे सर्व ऐकणाऱ्यात तो ही सामील होता. समजू लागल्या पासुन तो बाबांच्या सोबतच वाढला होता. किशोर वय. बाबांच्या सभेत, मिरवणूकीत बोला जयभीम म्हणतच तो तरुण झाला होता. बाबांच्या बळावर, बाबांनीच त्याला ताकद दिली होती. बाबांच्या प्रत्येक शब्दांवर त्याची एवढी भिस्त होती. तथापी बाबांच्या पश्चात् त्याला सर्वत्र निराधार, संभ्रमित, भयभीत व दिशा भ्रष्ट वाटू लागल्या होत्या. तोंडाची चव पळाली होती, घसा सुकून गेला होता, जीभ लोळागोळा झाली होती, अन्नाची वांछा नष्ट झाली हेाती. त्याला आपल्या शरीराची सुध्दा अनिच्छा वाटू लागली होती. बाबा नाहीत तर जगून काय उपयोग ? स्वधिकाराने तो स्वत:ला परका झाला होता. समोर महानिर्वाणाच्या गगनव्यापी ज्वाला लपलपून झेपा घेत होत्या. आक्रोशाने, विलाप व हताश स्वर आसमंतात भरुन गेले होते.

अचानक त्याला काय झाले कळेना. एकाएक अदम्य ताकदीने त्या अभेद्य मानव तटबंदीवर तो तुटून पडला आणि सुसाट सुटणाऱ्या बाणा प्रमाणे लपेटणाऱ्या ज्वालांच्या दिशेने झंझावात बनून धावू लागला. धक्के देत धक्के खात, गर्दीला चिरत तो वेगाने पुढे पुढे जात होता. तो काय करीत आहे हे कळण्यापुर्वीच लोकांना दिसले ते एवढेच की, त्याने आगीच्या लपेटीमध्ये स्वत:ला झोकून दिले. ह्यानंतर काय झाले त्याला कळले नाही. काहीच कळले नाही. बेशुध्द असतांना परळच्या के.ई.एम. इस्पितळामध्ये तो होता. जवळ जवळ तो मृतच होता. पण तो मेलेला नव्हता. बेशुध्दांच्या दुनियेत त्याची केस फेमस झाली होती. जीवंत आहे पण जीवंत नाही. डॉ. म्हणत त्यांच्या शरीरात प्राण आहे, चेतना आहे, श्वास चालु आहे, प्राण बाहेर जात नव्हता, म्हणूनच तो मृत जाहीर होत नव्हता. पण त्याला शुध्दीवर आणण्यातही यश येत नव्हते. आणि असा तो अचानक व आपसूकच 56 वर्षानंतर शुध्दीवर आला. सर्वांना आश्चर्य वाटले. नातेवाईकांचा पत्ता नव्हता. पण आता त्याला जूनी नाती आठवू लागली होती. त्याने मला आपली कहानी सांगितल्यावर विचारले, बाबा गेल्यावर काय झाले? आता मी काय सांगायचं ? मीच अनुत्तरीत झालो. तरीपण त्याच्या समाधाना खातर त्याला मी म्हणालो, बाबा गेल्यानंतर बाबांच्या ध्येयाप्रमाणे शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा हया संदेशाप्रमाणे लोक वागत आहेत. लोक शिकत आहेत. खूप शिकून मोठे मोठे होऊन राहायले आहेत. एकंदरीत समाजाची प्रगती फार मोठी झाल्यासारखी वाटते, फार बरी वाटते.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने दलित-शोषितांमध्ये जागृती होऊन त्यांनी शिक्षणाच्या वाटा धुंडाळल्या आणि त्यामुळे आत्मभाव व आत्मबळ प्राप्त झाले ही शिकलेली पिढी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या तत्वाने संघर्षशील झाली तेव्हापासुन माणूस म्हणुन जगण्याचा हक्क मागू लागली, वेळप्रसंगी आंदोलने करु लागली. यातूनच दलितांचे नेतृत्व ही निर्माण झाले, हे नेतृत्व समाजाच्या उत्थानासाठी कार्यरत राहू लागले पण पारंपारिक मानसिकतेच्या उच्चवर्णियांना ते असहय होऊ लागले, हे अधोरेखित सत्य आहे.

आपल्या समाजाने आजवर न्यायमुर्ती, विभागीय आयुक्त, आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य अभियंते, डॉक्टर, प्राध्यापक, खासदार, आमदार, नगरसेवक आणि पुष्कळ काही झालेत, सतत वाढ होत आहे. ज्यांची मोजदाद करता येणे शक्य नाही पण हे सर्व शिकण्यामुळे, पहिले नव्हते असे झालेत. मग तर छानच झालेत. मी शुध्दीवर आलो असतो तर मी देखील असा काही होऊ शकलो असतो. बरे जाऊ दे. सगळी जवानी बेशुध्दीत गेली आणि आता तर काय म्हाताराच झालो. बरं “संघटीत’ होण्याचं काय झालं? या संघटनेचं काय म्हणून विचारता ? बाबासाहेबांच्या पश्चात रिपब्लीकन चळवळीला मतभेद व परस्पर द्वेषांमुळे फुटीची लागण झाली आणि ती तुकडया-तुकडयांमध्ये विखुरली गेली. त्यामुळे जो एकसंघ परिणाम व्हायला हवा होता तो झाला नाही ही फार मोठी हानी होऊ लागली. हे भयावह वास्तव पाहिलं की मन सुन्न व बधीर होतं. दलित नेते सत्तालोलुपता आणि स्वार्थीवृत्तीने बरबटलेले असल्यामुळे अजुनही मुख्य प्रवाहापासुन दुर आहेत, ही शोकांतिका !

त्याचं असं आहे की आम्हाला इंग्रजांनी शिकवले होते की, खऱ्या एकीसाठी सर्वांनी नाही पण लहान लहान गटांनी एकत्र यावेत. इतर पाटर्यातही गटगटांची गटबाजी असते. तशी आमच्याकडेही आहे. आमच्या प्रत्येक गटाचा एकएक मोठा नेता आहे. हया प्रत्येक नेत्याला डॉ. बाबा साहेबांनी महानिर्वाणापूर्वी काही अधिकार दिले होते. असे ते नेते सांगतात. डॉ. बाबासाहेबांनी कोणाला आपला तोंड पुसून रुमाल दिला, कोणाला थोडेसे फाटले मोजे दिले, कोणाला बुट रिपेयर करायला दिला होता तो त्याने रिपेयर करुन न देता बाबांची प्रिय आठवण म्हणून उराशी कवटाळला. कोणाला कोट दिला, कोणाला काठी दिली. या सर्वांनी आपआपले गट स्थापन केले. कोणाला पत्र लिहिले, कोणाला लिफाफा लिहिला, कोणाला डिक्टेशन दिले, कोणाला मजकूर टाईप करायला दिला, त्यांनीही आपापले गट निर्माण केले. कोणाला सुके बोंबील आणायला सांगितले होते, तर त्याने बोंबिलाची कापलेली सुकी डोकीच आपल्या गटासाठी निवडली. तेव्हा प्रत्येक नेत्याचे म्हणणे असे की मी सच्चा आंबेडकरवादी आणि बाबांची खास खाजगी मालमत्ता बाळगून असलेला दावेकरी. तेव्हा बाबांच्या वेळी एकच संघटना होती. पण आता संघटनांचे हे विशाल जाळे पाहून बाबांना किती अभिमान वाटत असेल, नाही ? अशा अनेक संघटना फोफावल्या आहेत. गोरगरीबांच्या अंगने मे, अंगने मे काय आहे ?

अंगने म्हणजे आंगण. जिथे मुले रांगतात, मुततात, शि करतात, मोठे थुंकतात, पानाची पिचकारी मारतात, चूळ भरुन टाकतात त्याला अंगने मे असे म्हणतात. अमिताभ बच्चन नावाच्या सिने नटाने अंगने मे लोकप्रिय केले आहे. अस्स.. अस्स. बरं मग संघर्ष करा या संदेशाचे काय झाले ? वा.. बाबांना आवडेल असाच सर्व पातळीवर संघर्ष सुरु आहे. खेडे गावात आपल्या लोकांची अब्रू लुटतात, जाळून-मारुन टाकतात, अजूनही आपल्याला वाळीत टाकल्यासारखे वागताहेत. पाणी भरु देत नाही असा कितीतरी छळ चालत असतो.

बरं.. बाबासाहेब सारा भारत बौध्दमय करीन असे म्हणाले होते, त्याच काय झालं ? मी म्हटले आता सर्वत्र विहार बांधले जातात. चार फुट बाय तीन फुट, दोन फुट बाय पाच फुट, सहा फुट बाय चार फुट असे बौध्दविहार मिळेल त्या जागेत बांधण्याची मोठी स्पर्धा सुरु आहे. लोक बौध्द वंदना, त्रिसरण म्हणतात. बाकी काही नाही आले तरी चालेल पण त्रिसरण म्हणतातच म्हणतात. बौध्द भिक्कु देखील तयार केले जाताहेत. त्यामुळे बौध्दांची संख्या खूप वाढली आहे, आनंदाची बाब आहे. स्वत:ला मिरवण्यात अभिमान वाटतो की आम्ही बौध्द आहोत, किती लाजीरवाणी प्रकार आहे. आपण उदयांतरी कडे चाललो की, अधोगती कडे हेच कळेनासे होत आहे. काय अवस्था आहे आपल्या समाजाची. जो तो आपल्या गुर्मीत वावरतांना दिसतो आहे. अशावेळी कमीत कमी धम्माची वाताहात होता कामा नये यासाठी सर्व समाज बांधवांनी कटिबध्द राहायला पाहिजे कारण धम्म आपला जीवकी प्राण आहे.

चैत्यभूमीच्या भिंतीच्या पलीकडे श्मशानभूमी आहे. तेथे एक प्रेत सरणावर पेटले होते. धूरिया म्हणाले की, मी त्या चितेवर हा हार टाकून येतो. माझे काही नातेवाईक भेटतील तेथे, तूम्ही इथेच थांबा. रात्र खूप झाली होती. बराच वेळ थांबलो. धूरिया परतण्याचे चिन्ह दिसेना. चिते कडे पाहिले, तिथे कोणीच नव्हते. फक्त एकच गोष्ट धूरियाला सांगायची राहिली होती की, खरी एकी करण्यासाठी भरकस प्रयत्न चालू झाले आहे. एकीसाठी सर्व बिनगट एकत्र आलेले आहेत. आता काय फायनल, एकी ही झालीच समजा. धूरीया परतला नव्हता, पण मला त्याचा आवाज ऐकू येत होता. गेल्या 56 वर्षातले सत्यरुप हेच की आम्ही फुटीर असतांना तूम्ही स्वत:ला मोठे बलवान समजत आहोत ही निवळ बनवाबनवी वाटते सारासार जनतेच्या डोळयात धुळफेक चालली आहे. एवढया बलाढय शक्तिचं पार मातेरं झालं आहे. कोणाचा पाय पासे कोणात नाही. प्रत्येकानी आपली दुकानदारी थाटली आहे आणि गिऱ्हयाईक सुध्दा त्यांचे ठरलेले असल्यामुळे आपल्या ऐकीचीही दुरावस्था आहे. एकोपा होणे दुरापास्त झाले आहे. पुर्ववत आपण त्याच दिशेने वाटचाल तर करीत नाही नां? असा संभ्रम निर्माण होतो.

एकत्र आलात की तुमचे सगळे सामथ्र्य नाहीसे होईल, अशी तुम्हाला भिती वाटते. म्हणतात ना.. Divided we stand असे नाही तर United we stand हे तुम्हाला पटायला पाहीजे. अडचण ही की तो पेटणारा अनुभव गेल्या 56 वर्षानंतर परवा नेरवा अचानक अद्भूतपणे प्रकाशमय झाला नाही काय ? का त्या झगझगीत ऐक्यगामी प्रकाशाची आम्हाला भिती तर नाही वाटत ना ? आजही वेळ गेलेली नाही. आपण दुबळे नाहीत.

याचे भाण ठेवून चवताळून उठलात तर अच्छ्या अच्छ्याला गारद करु शकतो. एवढी ताकद आज आपल्या मनगटात निश्चितच आहे. याची जाण महाराष्ट्राला आहेच आहे, परंतू “नेत्यांना डेअरीच्या दूधाची सवय झाल्यामुळे आईच दूध कळू लागतंय”. आईच्या दूधातला आणि डेअरीच्या दूधातला फरक आम्हाल कळला असता तर आज महाराष्ट्राच्या विधान भवनावर निळा झेंडा फडकला असता. ते कां होत नाही ? याचं चिंतन मनन या ठिकाणी झाल पाहीजे. तेव्हा लक्षात ठेवा, बेकीनं मराल व मिटाल; एकीनं जगाल व जगवाल.

लेखक: प्रभाकर सोमकुवर

नागपूर, महाराष्ट्र

मोबाईल : 09595255952

डिस्क्लेमर (अस्वीकरण) : या लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखातील कोणत्याही माहितीची अचूकता, पूर्णता, व्यावहारिकता किंवा सत्यता यासाठी www.YuvaPrabhav.Com जबाबदार नाही. या लेखातील सर्व माहिती जशी आहे तशी मांडली आहे. या लेखात व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा तथ्ये किंवा विचार YuvaPrabhav च्या मालकीचे नाहीत आणि YuvaPrabhav त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. – एडिटर – इन – चीफ