चैत्यभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकत्यांचे आंदोलन…

1044

मुंबई – राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी चैत्यभूमीवर काही दिवसापूर्वी व्ह्युविंग गॅलरीचे उद्घाटन केले होते. त्यानंतर या गॅलरीला माता रमाई आंबेडकर असे नाव देण्यात आले. मात्र, या नावाचे अधिकृत पोस्टर या परिसरात सरकारकडून अद्याप लावण्यात आलेले नाही. त्याविरोधात आज मुंबईतले वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. चैत्यभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत मंत्री आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या शिळेवर रमाई व्ह्युविंग डेक असे पोस्टर लावले व माता रमाई जिंदाबाद अशा घोषणा दिल्या.

याबाबत माहिती देताना वंचितचे नेते आनंद जाधव म्हणाले की, “राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी चैत्यभूमीवर येऊन व्ह्युविंग डेकचे उद्घाटन केले. उद्घाटन झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले ही चैत्यभूमी आहे. येथे बाबासाहेबांची आठवण आहे. याला माता रमाई आंबेडकर यांचे नाव दिलं पाहिजे. लक्षात आल्यावर त्यांनी या संदर्भातील घोषणा केली. मात्र, रमाईंच्या नावाचे कोणतेही पोस्टर अथवा फलक या परिसरात अद्याप लावण्यात आलेले नाही. हा या सरकारचा खोटेपणा आहे आमचं या सरकारला आवाहन आहे त्यांनी लवकरात लवकर शुद्धीत यावं नाहीतर आम्हाला या सरकार विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल.”