दलित असल्यामुळेच वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीला उद्धव ठाकरेंचा नकार; शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप.

101

Mumbai : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकासआघाडीमध्ये कमालीचे मतभेद समोर येत आहेत, यामध्ये मुंबई दक्षिण मध्यचाही समावेश आहे. या जागेवरून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड लढण्यासाठी इच्छुक होत्या, पण ही जागा शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गेली आहे.

या जागेवरून ठाकरेंनी अनिल देसाई यांना तिकीट दिले आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे लोकसभेच्या मैदानात आहेत.

मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. एवढच नाही तर त्यांनी काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडकडे तक्रारही दाखल केली. एकीकडे हा वाद सुरू असतानाच शिवसेना नेते मिलिंद देवरा यांनी गौप्यस्फोट केला आहे.

‘वर्षा गायकवाड दलित असल्यामुळे मुंबईतून त्यांना उमेदवारी देऊ नये, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिला. काँग्रेसमधूनही वर्षा गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नेमणूक करायला विरोध झाला होता,’ असा आरोप मिलिंद देवरा यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या 21 उमेदवारांमधून फक्त एका दलित उमेदवाराला निवडणुकीत संधी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत 8 उमेदवार घोषित केले, त्यातले 3 दलित आहेत. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे दलितविरोधी राजकारण करत आहेत’, असा दावाही मिलिंद देवरा यांनी केला आहे.

मिलिंद देवरा काय म्हणाले – 

‘दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि उबाठा गटाची दलित विरोधी मानसिकता दिसून येते. उबाठा गट महाराष्ट्रात 21 जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र त्यात केवळ एका जागेवर उबाठा गटाने दलित उमेदवाराला संधी दिली आहे. आम्ही या निवडणुकीत तीन दलित उमेदवारांना संधी दिली आहे. महाविकास आघाडीत दलित उमेदवारांची प्रतारणा सुरु आहे. कारण काँग्रेस आणि उबाठामध्ये दलित समाजबांधवांना स्थान आणि मान नाही आणि खुल्या मतदारसंघातून दलित उमेदवार उभा करण्याची त्यांच्यात हिंमत नाही.

निवडणुकीत दलित समाजाची मते हवीत, पण या समाजाला नेतृत्वाची संधी द्यायची नाही, अशी दुटप्पी भूमिका उबाठा गटाची दिसून येते.

माझ्याकडे माहिती आहे की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला असे कळविले की वर्षा गायकवाड यांना खुल्या जागेवर (दक्षिण-मध्य मुंबई) तिकिट दिले तर दलित असल्यामुळे त्यांचा पराभव होईल. एक सुशिक्षित, सक्षम आणि राजकारणात आपल्या कामगिरीने ठसा उमटवणाऱ्या वर्षा गायकवाड यांच्याबाबत जे राजकारण होत आहे ते दुर्देवी आहे. अशा मानसिकतेचा मी निषेध करतो’, अशी पोस्ट मिलिंद देवरा यांनी केली आहे.