मॅट्रीमोनीअल साईट्चा वापर करून वापरुन 250 महिलांना घातला गंडा; तोतया ला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक.

12

बंगळुरु रेल्वे पोलिसांकडून एका 45 वर्षीय पुरुषाला अटक करण्यात आली आहे. मॅट्रिमोनियल साइट्स (Matrimonial Sites) चा वापर करून तब्बल 250 महिलांची फसवणूक केल्याचा आरोप ह्या व्यक्तीवर आहे. डेटींग साईट्स (Dating Sites), डेटींग अॅप्स (Dating Apps), वैवाहिक वैवाहिक वेबसाइट चा वापर करून तो महिलांशी संपर्क साधायचा. त्यांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळत आर्थिक फसवणूक करत असे. आरोपीची ओळख पटली असून त्याचे नाव नरेश पुजारी गोस्वामी असल्याचे पुढे आले आहे. तो मूळचा राजस्थानचा आहे. परंतू, विविध सोशल मीडिया मंचावरुन स्वत:ची ओळख दर्शवताना तो पाठीमागील दोन दशकापासून तो बंगळुरु येथे राहात असल्याचे सांगतो.

आरोपी नरेश पुजारी गोस्वामी याने विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बनावट प्रोफाइल सुरु केली होती. त्याद्वारे त्याने महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना फसवण्यासाठी कस्टम अधिकारी आणि सॉफ्टवेअर अभियंता असल्याचे भासवले. बंगळुरु रेल्वे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजीपी) एसडी शरणप्पा यांनी माहिती देताना सांगितले की, गोस्वामी याने ऑनलाईन डेटींग करुन मोडस ऑपरेंडी वापरत अनेक महिलांना लग्नाच्या चर्चेसाठी खोटा बहाणा करुन बंगळुरु येथे बोलावले होते. तेथे त्याने काही लोकांची नातेवाईक म्हणून ओळख करुन दिली. जे तोतया होते. आरोपी महिलांना बंगळुरु येथे बोलवत असे आणि त्यांना वेगवेगळ्या सबबी सांगून पैसे मागत असे. पैसे मिळाले की, तो पोबारा करत असे. पीडितांना पुढे त्याचा कोणताच ठावठिकाणा लागत नसे.

दरम्यान, एका पीडित महिलेने कोईम्बतूर येथे 23 फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली. तेव्हापासून तो पोलिसांच्या रडारवर आला आणि तपास सुरु झाला. रेल्वे पोलीस निरीक्षक संतोष एम पाटील यांनी सांगितले की, गोस्वामी विशेषत: विधवा आणि घटस्फोटित महिलांना लक्ष्य करत असे. त्यांच्या असुरक्षिततेचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांची आर्थिक लुबाडणूक करत असे. गोस्वामी अनेक महिलांशी रात्री उशीरपर्यंत फोनवर किंवा चॅटवर संवाद साधत असे आणि त्यांचा विश्वास संपादन करत असे. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या प्रकरणात 16 पीडितांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आरोपीबाबत माहिती मिळताच आणखीही तक्रारी प्राप्त होण्याची शक्यता आहे. आरोपी विरोधात आयपीसी 419 आणि 420 (फसवणूक) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जोडीदार ऑनलाईन शोधत असताना किंवा मॅट्रोमोनिअल साईट्स, डेटींग ॅप्स, डेटींग वेबसाईट्स आदींचा वापर करताना वापरकर्त्यांनी नेहमीच दक्षता बाळगली पाहिजे. आपली व्यक्तीगत माहिती, डेटा, तपशील अथवा ओळख अपरिचीत व्यक्तीला जाणार नाही याबाबत विशेष दक्षता घ्यावी असे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जाते.