Thane : कोट्यवधी रुपयांचे ‘हॅश’ तेल जप्त, चार जणांना अटक

20

Thane : ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत चरस या अमली पदार्थांपासून तयार केले जाणार हॅश तेल विक्री करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. याप्रकरणी अभिजीत भोईर (२९), पराग रेवंडकर (३१), सुरेंद्र अहिरे (५४) आणि राजु जाधव (४०) यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी त्यांच्याकडून दीड कोटी रुपयांचा हॅश तेल जप्त केला आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ऋषभ भालेराव याला अटक केली होती. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्याच्या या चार साथिदारांना अटक केली. दिल्ली, हरियाणा, पंजाबमधील तरूणांकडून या हॅश तेलाची मागणी अधिक असल्याचे समोर आले आहे. या पदार्थाच्या एक ग्रॅमची किंमत १० हजार रुपये इतकी आहे.

इन्स्टाग्राम या समाजमाध्यमाद्वारे अमली पदार्थ विक्रीचे संदेश पाठवून ऋषभ भालेराव हा हॅश तेलाची कुरिअरद्वारे विक्री करत होता. त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर ३ हजारहून अधिक चाहते (फॉलोवर्स) आहेत. काही दिवसांपूर्वी ऋषभला गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटने अटक केली होती. त्याची चौकशी केली असता, तो हे अमली पदार्थ अभिजीत भोईर याच्याकडून खरेदी करत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अभिजीत भोसले याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून १ लाख ४६ हजार १६० रुपयांचा चरस आणि गांजा जप्त केला. त्याची चौकशी केली असता, त्याने हे अमली पदार्थ सुरेंद्र आणि राजु या दोघांकडून घेतल्याचे समोर आले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, साहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांच्या पथकाने सापळा सुरेंद्र आणि राजु यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे १ कोटी ५० लाख ७० हजार ७०० रुपयांचा हॅश तेलचा साठा जप्त करण्यात आला आहे. चौघांना अटक करण्यात आली असून हे तेल कुठून आणले जात होते. याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.