महाराष्ट्र आणि गुजरातसाठी “किलकारी” या फिरत्या आरोग्य (एम-हेल्थ) उपक्रमाचा प्रारंभ…

लक्ष्यित लाभार्थ्यांना, प्रसूती पूर्व, नवजात आणि बाल आरोग्य सेवेविषयी आय. व्ही. आर. एस. च्या माध्यमातून साप्ताहिक सेवा, उपलब्धता, अचूक आणि प्रासंगिक असे 72 ध्वनिमुद्रित संदेश देणे हे किलकारी कार्यक्रमाचे उद्दिष्ट: डॉ. भारती प्रवीण पवार

21

नवी दिल्ली : गुजरात आणि महाराष्ट्रातील स्थानिक भागातील लाभार्थ्यांसाठी किलकारी या फिरत्या आरोग्य (एम-हेल्थ) उपक्रमाचा, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंग बघेल आणि डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रारंभ केला. मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्यांच्या (आशा) ज्ञानाचा विस्तार आणि अद्ययावतीकरण करण्यासाठी तसेच मोबाईल फोनद्वारे त्यांचे संवाद कौशल्य उंचावण्यासाठी तयार केलेला मोबाइल अकादमी हा एक विनामूल्य ध्वनिमुद्रित प्रशिक्षण अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात आला. गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेलही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या उपक्रमांचा प्रारंभ झाल्याबद्दल डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आनंद व्यक्त केला. मानवजातीच्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल आरोग्य भारत निर्माण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयदृष्टीच्या अनुषंगाने, देशातील आरोग्य क्षेत्राच्या परिवर्तनाच्या वेगवान गतीशी एम-आरोग्य उपक्रम संयुक्तीक आहे असे त्या यावेळी म्हणाल्या.

आरोग्य सेवेत कार्यरत, विशेषतः आघाडीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी ‘किलकारी’ कार्यक्रम हाती घेत योगदान देण्याचे त्यांनी कौतुक केले. लक्ष्यित लाभार्थ्यांना, प्रसूती पूर्व, नवजात आणि बाल आरोग्य सेवेविषयी आय. व्ही. आर. एस. च्या माध्यमातून साप्ताहिक सेवा, उपलब्धता, अचूक आणि प्रासंगिक असे 72 ध्वनिमुद्रित संदेश देणे हे किलकारी कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

किलकारी कार्यक्रमाचा प्रारंभ हा सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांना प्राधान्य देणे आणि भारताच्या विस्तारीत मोबाईल फोनचा लाभ घेऊन नागरिक-केंद्रित आरोग्य सेवा बळकट करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा भाग असल्याचे प्रा. एस. पी. सिंग बघेल यावेळी म्हणाले.

“केवळ एक आरोग्यदायी आईच आरोग्यदायी मुलाला जन्म देऊ शकते” हे अधोरेखित करत, माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने महिलांचे आरोग्य आणि कल्याण याची खातरजमा करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत असे प्रा. बघेल यांनी नमूद केले.

 

केंद्रीय मंत्र्यांनी उद्‌घाटनात सहभागी असलेल्या सर्व हितधारकांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि कार्यक्रमाला आणखी बळकटी देण्यासाठी संबंधितांकडून सूचना मागवल्या.

गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दोन उपक्रम सुरू केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. गुजरातमध्ये 95% पेक्षा जास्त प्रसूती आता संस्थात्मक झाल्यामुळे माता आणि अपत्य दोघांसाठी त्या सुरक्षित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

पार्श्वभूमी:

‘किलकारी’ (म्हणजे ‘बाळाचे खिदळणे’ ), ही केंद्रीकृत संवादात्मक ध्वनी प्रतिसाद (आयव्हीआर) आधारित मोबाइल आरोग्य सेवा आहे जी गर्भधारणा, बाळंतपण आणि बाल संगोपन विषयक 72 श्राव्य संदेश थेट कुटुंबांच्या मोबाईल फोनवर गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीपासून मूल एक वर्षाचे होईपर्यंत मोफत, साप्ताहिक, कालबद्ध पद्धतीने वितरीत करते.

महिलेच्या एलएमपी (शेवटची मासिक पाळी) किंवा मुलाच्या डिओबी (जन्मतारीख) नुसार ज्या महिला प्रजनन बाल आरोग्य (आरसीएच) पोर्टलमध्ये नोंदणीकृत आहेत अशा गरोदर महिला आणि एक वर्षाच्या आतील मुलांच्या मातांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर आधीच ध्वनिमुद्रित केलेल्या श्राव्य संदेशासह आठवड्यातून एकदा फोन केला जातो. किलकारी ऑडिओ संदेश डॉ. अनिता नावाच्या काल्पनिक डॉक्टरांच्या आवाजात आहेत.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे किलकारी कार्यक्रम सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्रीकृत पणे आयोजित केला जातो आणि तंत्रज्ञान, दूरध्वनी पायाभूत सुविधा किंवा कार्यान्वयन खर्च राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी उचलण्याची आवश्यकता नाही. ही सेवा राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि लाभार्थींसाठी मोफत आहे. हा कार्यक्रम आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीकृत प्रजनन बाल आरोग्य (आरसीएच) पोर्टलसह समाकलित केलेला आहे आणि या मोबाईल आरोग्य सेवेसाठी माहितीचा एकमेव स्रोत आहे.

मोबाइल अकादमी हा एक विनामूल्य ऑडिओ प्रशिक्षण अभ्यासक्रम आहे ज्याची संरचना मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्यांच्या (आशा) अद्ययावत माहितीसाठी आणि ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यासाठी तसेच त्यांच्या मोबाइल फोनद्वारे त्यांची संवाद कौशल्ये सुधारण्यासाठी केलेली असून तो किफायतशीर आणि कार्यक्षमही आहे. हा कधीही, कुठेही प्रशिक्षण घेण्याजोगा अभ्यासक्रम आहे जो मोबाईल फोनद्वारे एकाच वेळी हजारो आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करू शकतो.

सध्या आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, आसाम, बिहार, छत्तीसगड, चंदीगड, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि उत्तराखंड या 18 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये किलकारीची अंमलबजावणी सुरू आहे. तसेच चंदीगड वगळता मोबाइल अकादमी 17 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात हिंदी, भोजपुरी, ओरिया, आसामी, बंगाली आणि तेलगू या सहा भाषांमध्ये कार्यरत आहे.