वैद्यकीय पदवी, पदव्युत्तर परीक्षा 15 जुलैपासून प्रारंभ होणार..

360

मुंबई : राज्यातील पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय शाखांच्या परीक्षा जुलै १५ पासून घेण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी कुलपती तथा राज्यपाल यांना दिली आहे. कुलपती यांनी परीक्षेसंदर्भातील तीन पर्यायांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे, असे राजभवनने काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी राज्यपालांची भेट घेऊन राज्यपालांना आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे तयार करण्यात आलेला वैद्यकीय परीक्षा घेण्याबाबतचा आराखडा सादर केला होता.

विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात केलेल्या नियोजनाचे या वेळी राज्यपालांनी कौतुक केले. पहिल्या प्रस्तावानुसार परिस्थिती अनुकूल असल्यास सर्व लेखी परीक्षा १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येतील.एमडी, एमएस पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचर्या व तत्सम तसेच सर्व पदवी विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. १५ जुलै पासून वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शक्य न झाल्यास परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.

लेख,बातम्या, प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी yuvaprabhav@gmail.com वर मेल कराव्यात.
योग्य व उत्कृष्ट लिखाणास आपल्या वेब पोर्टल वर प्रसिद्ध केल्या जातील… (संपादक)