महाराष्ट्रात जातीय अत्याचाराचे थैमान; परळीत बौद्ध तरुणाची निर्घृण हत्या.

52

परळी : पुरोगामी महाराष्ट्रात दलीत अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. परळी मधून एक संतापजनक घटना समोर येत आहे. वीटभट्टीवर सुपरवायझर म्हणून काम करणारा बौध्द समाजातील आकाश रोडे या बौध्द तरुणाला बेदम मारहाण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेत पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने, बनाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आकाश रोडे (वय ३५) हा होतकरू तरुण होता, मारेकऱ्यांनी त्याला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट केले. या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.

परळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्रासपणे दलितांवर हल्ले सुरू आहेत. परळी दलित अत्याचारग्रस्त झालेली आहे. येथे बौध्द सुरक्षीत नाही. पोलिसांनी पुरावे नष्ट करण्यास मदत केली. पंचनामा जागेवर का केला नाही? आकाशच्या परिवाराला घटनेची माहिती का दिली नाही? यामागे घटना दाबण्यासाठी सत्ताधारी आणि पोलिसांचे संगनमत असल्याचा आरोप ऑल इंडिया पँथर सेना अध्यक्ष दीपक केदार यांनी केला आहे. त्याचबरोबर आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

घटनेच्या रात्री जे पोलीस आकाशला घेऊन जात होते परिवाराला माहिती देत नव्हते, त्यांच्या मोबाईलचे डिटेल तपासले पाहिजेत. कोणत्या नेत्याच्या दबावात येथील पोलिस आरोपींना पाठीशी घालत आहेत याचा सुद्धा तपास करून संबधित पोलिसांवर कारवाईची मागणी दीपक केदार यांनी केली आहे.