तुळजापूर- महाराष्ट्राची कुलदैवत म्हणून मान्यता असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश करून तुळजापुरातील काही महिलांनी देवीचे चरणस्पर्श करत जुनी प्रथा माेडल्याचा दावा केला. शनिवारी सायंकाळी प्रक्षाळ पूजेनंतर घडला. ह्या घटनेवर प्रतिक्रिया देताना मंदिर संस्थानच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी मात्र दोन पुजारी वर्गातील मतभेदांतून हा प्रकार घडल्याचे सांगितले. तुळजापुरात पाळीकर व भोपे अशा दोन पुजारी गटात वाद आहे. भोपे पुजारी वर्गातील महिलांव्यतिरिक्त इतर महिलांना मूर्तीला स्पर्श करण्याचा अधिकार नाही, असे सांगितले जाते.
तुळजाभवानी मंदिर गाभाऱ्यात प्रवेश करून काही महिलांनी तुळजाभवानी मातेचे चरणस्पर्श दर्शन घेतले. त्यानंतर महिलांनी प्रथा मोडल्याचा दावा करीत मंदिर परिसरात जल्लोष केला. ह्या घटनेने खळबळ उडाली आहे, अॅड. मंजुषा मगर, विभावरी गंगणे, वासंती जगताप आदी २० ते २५ महिलांचा समावेश होता.








