मुंबई : भयंकर अपघातात पोलिसाचा मृत्यू, पुलाच्या कामावेळी पाइलिंग रिग मशीन अंगावर कोसळली..

89

मुंबई  : काल झालेल्या एका भीषण अपघातामध्ये मुंबई  पोलिसाचा मृत्यू झाला आहे. सायन-पनवेल महामार्गावर मंगळवारी रात्री ही घटना घडली. वाशी पुलाजवळ मुंबई महानगर पालिकेकडून सुरू असलेल्या पूलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी मोठी पाइलिंग रिग मशीन अचानक अनियंत्रित होऊन उलटली. ही मशीन अंगावर कोसळून पोलिस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांचा मृत्यू झाला. ते मुंबई पोलिस दलात कार्यरत होते.

मुंबई महानगर पालिकेचा रस्ते वाहतूक आणि पूल विभाग वाशी पुलाजवळ महामार्गावर काम करत होते. जमीन खोदण्यासाठी पाइलिंग रिग मशीनचा वापर केला जात होता. हे काम सुरू असताना मशीन अचानक अनियंत्रित झाली आणि कोसळली. या ठिकाणावरून जाणारे पोलिस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांच्या अंगावर ही मशीन पडली. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले आणि अधिक रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर महामार्गावरील बांधकाम थांबवण्यात आले. ही मशीन बाजूला हटवून पोलिस कॉन्स्टेबलचा मृतदेह बाजूला काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, या घटनेप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली आहे.