वैजापूर हत्याकांड: रोहित पठारे खून प्रकरणात पोलिसांचे धडक ‘अटकसत्र’; सतरा जण ताब्यात, फरार आरोपींच्या भोवती आवळला फास!

147

वैजापूर (छत्रपती संभाजीनगर): गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीतील वादातून पेटलेल्या संघर्षातून झालेल्या रोहित अनिल पठारे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात वैजापूर पोलिसांनी तपासाचा वेग प्रचंड वाढवला आहे. पोलिसांनी सोमवारी पहाटे धडक कारवाई करत आणखी सहा आरोपींना बेड्या ठोकल्या असून, एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची एकूण संख्या आता १७ वर पोहोचली आहे.

पहाटेच्या कारवाईत सहा आरोपींना ठोकल्या हातकड्या

पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वैजापूर पोलीस व गुन्हे शाखेने एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. काहींना पहाटेच्या वेळी तर काहींचा आंतरजिल्ह्यात पाठलाग करून जेरबंद करण्यात आले.

अटक करण्यात आलेले नवीन आरोपी:

१. अविनाश ऊर्फ अनिकेत पोपट होंड

२. ज्ञानेश्वर सीताराम वडाळकर

३. प्रतीक कैलास साळुंके

४. रोहित मच्छिंद्र आहेर

५. संकेत आदिनाथ आहेर

६. तुषार आदिनाथ आहेर (सर्व रा. वैजापूर)

(याशिवाय एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.)

पूर्वी अटक करण्यात आलेल्या १० आरोपींमध्ये (मुख्य आरोपी अमन सत्यपाल उंटवाळसह) या नवीन ७ जणांची भर पडल्याने एकूण १७ जण सध्या पोलिसांच्या कोठडीत आहेत.

विशेष पथके सक्रिय; फरार आरोपींचा शोध सुरू

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या निर्देशानुसार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि वैजापूर पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे इतर फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

वैजापुरातील या भीषण गँगवॉर आणि हत्येप्रकरणातील उर्वरित मुख्य सूत्रधार व संशयितांना लवकरच गजाआड करून संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

– ब्युरो रिपोर्ट, युवा प्रभाव न्यूज