शिक्षणाने विचार दिला, मग अंधश्रद्धेच्या दारात विवेक का हरवला?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला अधिकार, स्वाभिमान आणि समानतेचा मार्ग दाखवला, आज त्यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या समाजातील सुशिक्षित महिलांनी स्वतःला प्रश्न विचारण्याची वेळ!

102

एखादी महिला शिकते, उच्च शिक्षण घेते, नोकरी करते, स्वतःच्या पायावर उभी राहते, संविधान वाचते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगते आणि दुसऱ्याच क्षणी नवस, मन्नत, पाया पडणे, देवदर्शन आणि चमत्काराच्या आशेने आपले प्रश्न सुटतील, या मानसिकतेकडे वळते तेव्हा प्रश्न त्या महिलेच्या श्रद्धेचा नसतो तर प्रश्न असतो तो शिक्षणातून मिळालेल्या विवेकाचा वापर आपण किती करतो याचा! विशेषतः आंबेडकरी विचारांची ओळख सांगणाऱ्या समाजात हा प्रश्न अधिक गंभीरपणे विचारला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी केवळ शिक्षण घेण्याचा संदेश दिला नाही, शिक्षणातून विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि अन्यायाला आव्हान देण्याची ताकद निर्माण व्हावी, हा त्यांच्या सामाजिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू होता. म्हणूनच एखाद्या सुशिक्षित महिलेने गणपतीच्या मूर्तीसमोर हात जोडले म्हणून तिच्यावर व्यक्तिगत टीका करणे हा या लेखाचा हेतू नाही. श्रद्धा ही वैयक्तिक बाब आहे. परंतु जेव्हा एखाद्या सामाजिक चळवळीने विवेक, समता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह धरला असेल, तेव्हा त्या चळवळीच्या मूल्यांशी आपल्या आचरणाचा मेळ बसतो का, हा प्रश्न विचारण्याचा अधिकार समाजाला नक्कीच आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्त्री-पुरुष समानतेचे प्रखर पुरस्कर्ते होते. त्यांनी महिलांच्या विवाह, वारसा, संपत्ती आणि सामाजिक स्थानाशी संबंधित सुधारणांसाठी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून व्यापक कायदेबदलाचा प्रयत्न केला. अधिकृत सरकारी नोंदींमध्येही त्यांच्या स्त्री-पुरुष समानतेच्या भूमिकेचा आणि महिलांच्या वारसा व विवाहातील समान अधिकारांसाठीच्या प्रयत्नांचा उल्लेख आहे. हिंदू कोड बिलाच्या प्रस्तावित तरतुदींमध्ये स्त्रीच्या संपत्तीला तिची स्वतंत्र मालमत्ता मानण्यासारख्या महत्त्वाच्या बाबी होत्या. इतकेच नव्हे, या विधेयकाला अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी १९५१ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला, असे राष्ट्रपतींच्या अधिकृत भाषणाच्या नोंदीत नमूद आहे. म्हणून आजची महिला शिक्षण घेते, नोकरी करते, मालमत्तेवर अधिकार सांगते, समानतेची भाषा बोलते, स्वतःचे निर्णय घेते. या प्रवासामागे केवळ तिचे वैयक्तिक कर्तृत्व नाही, स्त्रीच्या अधिकारांसाठी लढलेल्या सामाजिक आणि घटनात्मक संघर्षाचाही मोठा वाटा आहे. मग प्रश्न एवढाच की ज्या विचारांनी स्त्रीला माणूस म्हणून उभे केले, त्या विचारांपेक्षा आपण पुन्हा चमत्कार आणि नवसाला मोठे का मानतो?
गणपतीच्या पाया पडल्याने धनसंपत्ती येते का? हा प्रश्न श्रद्धेचा अपमान करण्यासाठी नाही, तर कारण-परिणामाचा विचार करण्यासाठी आहे. गणपतीच्या पाया पडल्याने अचानक संपत्तीचा वर्षाव होतो का? नवस केला म्हणून नोकरी मिळते का? मन्नत मागितली म्हणून परीक्षा उत्तीर्ण होता येते का? व्यवसायात यश मिळते का? घरातील आर्थिक प्रश्न आपोआप सुटतात का?जर तसे असते, तर जगातील कोणालाही शिक्षण, मेहनत, कौशल्य, नियोजन किंवा संघर्षाची गरजच राहिली नसती. देवाला नवस करण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणासाठी बचत करणे, आरोग्यासाठी उपचार घेणे, रोजगारासाठी कौशल्य मिळवणे आणि अन्यायाविरुद्ध कायदेशीर मार्गाने लढणे अधिक परिणामकारक नाही का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. श्रद्धा ठेवायची की नाही, कोणत्या धार्मिक परंपरेचे पालन करायचे, हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक अधिकार आहे. परंतु श्रद्धेला विवेकाची साथ असणे आणि अंधश्रद्धेला प्रश्न विचारणे, ही सामाजिक जबाबदारी आहे.

आपल्या समाजात अनेकदा एखादी इच्छा पूर्ण झाली की त्याचे श्रेय नवसाला दिले जाते आणि इच्छा पूर्ण झाली नाही तर ‘देवाची इच्छा’ म्हणून विषय संपतो. परंतु माणसाच्या यशामागे असलेली मेहनत, नियोजन, कौशल्य, शिक्षण, परिस्थिती आणि सामाजिक आधार यांचा विचार कुठे होतो? एक विद्यार्थिनी परीक्षेत उत्तीर्ण झाली तर तिच्या रात्रीच्या अभ्यासापेक्षा नवस आठवतो. एखादी महिला नोकरी मिळवते तर तिच्या संघर्षापेक्षा मंदिरातील दर्शन आठवते. एखाद्याचा व्यवसाय यशस्वी झाला तर बाजारपेठेचे ज्ञान आणि परिश्रमापेक्षा देवदर्शनाचे महत्त्व सांगितले जाते. ही मानसिकता व्यक्तीच्या स्वतःच्या कर्तृत्वालाच कमी लेखणारी नाही का? बाबासाहेबांचा संदेश माणसाने स्वतःच्या बुद्धीवर आणि प्रयत्नांवर उभे राहण्याचा होता, म्हणूनच आंबेडकरी समाजाने भावनिक घोषणांपेक्षा विचार आणि आचरण यांच्यातील अंतर तपासण्याची गरज आहे.
आजची महिला डॉक्टर आहे, इंजिनिअर आहे, प्राध्यापिका आहे, प्रशासकीय अधिकारी आहे, उद्योजिका आहे. ती विमान चालवते, संशोधन करते, न्यायालयात युक्तिवाद करते आणि अंतराळातही पोहोचली आहे. मग तिच्या बुद्धीसमोर अंधश्रद्धेची भिंत का उभी राहावी? शिक्षण म्हणजे फक्त पदवी नाही. शिक्षण म्हणजे प्रश्न विचारण्याची क्षमता, म्हणूनच एखादी महिला धार्मिक श्रद्धा पाळत असेल तर तिला कमी लेखण्याऐवजी आपण तिला एक प्रश्न विचारू शकतो. “तुमची श्रद्धा तुमच्या विवेकाला बळ देते आहे की विवेकाला प्रश्न विचारण्यापासून थांबवते आहे?” हा प्रश्न पुरुषांनाही तितकाच लागू आहे. अंधश्रद्धेविरोधाचा लढा फक्त महिलांविरुद्ध किंवा कोणत्याही एका समाजाविरुद्ध नसावा. पुरुषांनीही त्याच निकषाने स्वतःचे आचरण तपासले पाहिजे.

जेव्हा संविधान, बाबासाहेबांचे विचार, समता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची भाषा करणारा समाज दुसरीकडे चमत्कार, नवस आणि कर्मकांडावर अवलंबून राहतो, तेव्हा नव्या पिढीसमोर विरोधाभासी संदेश जातो. एकीकडे आपण मुलांना म्हणतो “शिका, मोठे व्हा, प्रश्न विचारा.” आणि दुसरीकडे सांगतो “नवस कर, पाया पड, इच्छा पूर्ण होईल.” मग मुलांनी नेमके कोणावर विश्वास ठेवायचा, स्वतःच्या कर्तृत्वावर की चमत्कारावर? हीच खरी चिंता आहे. डॉ. आंबेडकरांनी महिलांच्या अधिकारांसाठी केलेला संघर्ष हा केवळ इतिहासातील अध्याय नाही. तो आजच्या महिलेला मिळालेल्या समानतेच्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे. त्या अधिकारांचा अर्थ केवळ मालमत्तेचा हक्क किंवा शिक्षणाचा अधिकार नाही; स्वतंत्र विचार करण्याचा अधिकारही त्यात अभिप्रेत आहे.

बाबासाहेबांच्या जयंतीला मोठमोठे कार्यक्रम, व्याख्याने, घोषणा, निळे झेंडे आणि अभिवादनाचा जल्लोष होतो. पण दुसऱ्याच दिवशी जर त्यांच्या विचारांच्या विरुद्ध आचरण होत असेल तर आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार घालणे सोपे आहे, त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवणे कठीण आहे. महिलांनी स्वतःच्या अधिकारांसाठी उभे राहावे, मुलींना उच्च शिक्षण द्यावे, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, संविधान समजून घ्यावे, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, अंधश्रद्धेला प्रश्न विचारावा आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा, हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल. गणपतीच्या पाया पडल्याने कोणाचे धन वाढते की नाही, मन्नत पूर्ण होते की नाही, याचा निर्णय प्रत्येक व्यक्तीने आपल्या विवेकाने घ्यावा पण समाज म्हणून एक गोष्ट निश्चितपणे सांगता येईल. माणसाचे भविष्य नवसाने नव्हे, तर विचारांनी आणि प्रयत्नांनी घडते.
स्त्रीचे सामर्थ्य चमत्कारात नव्हे, तर तिच्या शिक्षणात, स्वाभिमानात आणि निर्णयक्षमतेत आहे आणि बाबासाहेबांचा खरा वारसा त्यांच्या नावाच्या जयघोषात नव्हे, तर विवेकवादी आचरणात आहे! म्हणून प्रश्न गणपतीचा नाही, प्रश्न आपल्या विचारांचा आहे. प्रश्न श्रद्धेचा नाही, प्रश्न अंधश्रद्धेचा आहे. प्रश्न महिलांच्या धर्माचा नाही, प्रश्न त्यांच्या स्वतंत्र विवेकाचा आहे आणि सर्वांत महत्त्वाचे, प्रश्न बाबासाहेबांना मानण्याचा नाही तर प्रश्न बाबासाहेबांना समजून घेण्याचा आहे!

*****

प्रवीण बागडे

नागपूर

मो.क्र. ९९२३६२०९१९