दुगाव (नाशिक): नाशिक तालुक्यातील दुगाव येथील तिडके मळा परिसरातील नागरिक गेल्या ५-६ दिवसांपासून अंधाराचा सामना करत आहेत. येथील H- नंबर ४५२ आणि आसपासच्या परिसरात महावितरणची वीज सेवा खंडित झाली आहे. भर उन्हाळ्यात आणि उकाड्यात सलग पाच-सहा दिवस वीज गायब असल्याने येथील नागरिक, महिला आणि लहान मुलांचे अतोनात हाल होत आहेत. मात्र, या गंभीर समस्येकडे महावितरणच्या स्थानिक प्रशासनाने पूर्णपणे डोळेझाक केली आहे.
तक्रारींची साधी दखलही घेईना महावितरण!
परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने जागरूक नागरिकांनी तात्काळ महावितरणच्या नियंत्रण कक्षाशी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अनेक नागरिकांनी फोन करून तक्रार करण्याचा प्रयत्न केला, मात्र महावितरणकडून नागरिकांची साधी तक्रार नोंदवून घेण्याचीही तसदी दाखवली जात नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
“आमची सुट्टी आहे, सोमवारी येऊ!” अधिकाऱ्यांची उद्धट उत्तरे
एकीकडे राज्य सरकार आणि ऊर्जा खाते ग्राहकांना २४ तास अखंडित वीज सेवा देण्याचे दावे करत असताना, दुसरीकडे दुगावमधील महावितरणचे अधिकारी मात्र मुजोर झाले आहेत. हवालदिल झालेल्या नागरिकांनी जेव्हा विजेबाबत विचारणा केली, तेव्हा “आज आमची सुट्टी आहे, काय करायचे ते करा, आम्ही सोमवारीच येऊ” अशी अत्यंत उद्धट आणि बेजबाबदार उत्तरे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून दिली जात आहेत. शासकीय कर्तव्याचा विसर पडलेल्या या अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे संतप्त नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
महावितरणचे अधिकारी झोपेतून जागे होणार कधी?
पाच दिवस उलटूनही वीज पूर्ववत न झाल्याने घरातील अन्नपदार्थ खराब होत असून, पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी अंधारामुळे चोऱ्यांचे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय वाढले आहे. जनतेच्या पैशांवर पगार घेणारे अधिकारी जर ‘सुट्टी’चे कारण पुढे करून नागरिकांना अंधारात सडवणार असतील, तर त्यांच्यावर वरिष्ठ पातळीवरून कडक कारवाई का केली जात नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या मुजोर कर्मचाऱ्यांना शिस्त लावून दुगावचा अंधार दूर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








