मुंबई: मुलुंड, भांडुप आणि कांजूरमार्ग परिसरातील मौल्यवान भूखंड अदानी समूहाच्या स्वाधीन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून आता मुंबईत तीव्र संघर्षाची ठिणगी पडली आहे. सरकारच्या या वादग्रस्त निर्णयामुळे मुंबईतील पर्यावरण आणि स्थानिकांच्या भविष्याला मोठा धोका निर्माण झाल्याचा आरोप करत, मुंबईकरांनी याविरोधात उग्र आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
याच पार्श्वभूमीवर, सजग मुंबईकर आणि सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे प्रवक्ते राकेश शंकर शेट्टी यांनी मुलुंड, भांडुप आणि कांजूरमार्गच्या तमाम रहिवाशांना उद्या रविवारी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध नोंदवण्याचे जाहीर आवाहन केले आहे.
नेमका आक्षेप कशावर?
प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे पूर्व उपनगरातील पर्यावरण धोक्यात येणार असल्याचे राकेश शेट्टी यांनी म्हटले आहे. अदानी समूहाला दिली जाणारी १५६ एकर जमीन ही केवळ जमीन नसून, ती मुंबईचे फुफ्फुस असलेले खारफुटीचे जंगल (Mangroves), मिठागरे (Saltpans) आणि हक्काच्या मोकळ्या जागा आहेत. हा भूखंड कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात घातल्यास परिसरातील हवेची गुणवत्ता ढासळेल आणि आपल्या मुलांचे भविष्य धोक्यात येईल, अशी भीती राकेश शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
उद्या मुलुंडमध्ये आंदोलन ;
या पर्यावरणीय अन्यायाविरोधात सरकारला जनतेची ताकद दाखवण्यासाठी उद्या (रविवार, ७ जून २०२६) मुलुंड महाराष्ट्र मंडळ, केळकर रोड, मुलुंड (पश्चिम) येथे एका भव्य निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही आपली जमीन, ही आपली लढाई!”
“आता आपण गप्प बसलो, तर आपल्या हक्काच्या जागा कायमच्या हातातून जातील. मुलुंड, भांडुप आणि कांजूरमार्गचे नागरिक हा अन्याय कदापि सहन करणार नाहीत,” असा इशारा देत राकेश शेट्टी यांनी नागरिकांना आपापल्या कुटुंबियांसह, मित्रांसह आणि शेजाऱ्यांसह या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ‘जय हिंद! जय महाराष्ट्र!’ चा नारा देत हा आपल्या हक्काचा शेवटचा लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या जनआक्रोश आंदोलनामुळे पूर्व उपनगरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले असून, उद्या होणाऱ्या या गर्दीकडे प्रशासनाचे बारीक लक्ष असणार आहे.








