अग्रलेख: ‘गृहमंत्रालय’ की राजकीय सुंदोपसुंदी? महाराष्ट्राला हवा पूर्णवेळ कारभारी!

125

महाराष्ट्र ही संतांची, विचारांची आणि कायद्याचे राज्य मानणारी पुरोगामी भूमी आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे जे धिंडवडे निघाले आहेत, ते पाहता हा छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

पुण्यात उघडकीस आलेले हातभट्टीच्या विषारी दारूचे जीवघेणे प्रकरण, राज्यात महिलांवर होणारे अत्याचार, दिवसाढवळ्या होणारी गुंडगिरी आणि सर्रास घडणारे खून सत्र यांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, “राज्यातील कायदा सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती पाहता देवेंद्र फडणवीस यांनी प्रायश्चित घ्यावे आणि राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा,” ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली मागणी केवळ राजकीय नसून ती जनतेच्या मनातील तीव्र संतापाचे प्रतिनिधित्व करते.

पुणे, जे महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखले जाते, तिथे हातभट्टीची विषारी दारू विकली जाते आणि निष्पापांचे बळी जातात, ही बाब अत्यंत लाजीरवाणी आहे. गृहविभागाचे आणि पोलिसांचे गुप्तहेर खाते नेमके काय करत आहे? छुप्या पद्धतीने चालणारे हे अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, याचे उत्तर गृहमंत्र्यांनी दिले पाहिजे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे, राज्यातील माता-भगिनी आज स्वतःला असुरक्षित समजत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही राज्याच्या कायदा व्यवस्थेला लागलेले मोठे गालबोट आहे. गुंडांना कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही आणि खाकी वर्दीचा दरारा संपल्याचे चित्र गल्लीबोळातील गुंडगिरीवरून स्पष्ट दिसत आहे.

या सर्व गोंधळाचे मुख्य मूळ हे राज्याच्या गृहविभागाला मिळणाऱ्या अपुऱ्या वेळेत आहे, हे उघड गुपित आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, पक्षाचे मोठे नेते आहेत आणि त्यांच्यावर अनेक राजकीय व प्रशासकीय जबाबदाऱ्या आहेत. अशा परिस्थितीत, अत्यंत संवेदनशील असलेल्या आणि २४ तास पूर्ण लक्ष देण्याची गरज असलेल्या ‘गृहविभागा’ला ते पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत, हेच या बिघडलेल्या परिस्थितीवरून सिद्ध होत आहे. जेव्हा राज्याचा गृहमंत्री राजकीय डावपेच आणि पक्षाच्या बांधणीतच जास्त व्यग्र असतो, तेव्हा गुन्हेगारांचे मनोबल वाढणे स्वाभाविक आहे.

आता वेळ केवळ आरोप-प्रत्यारोपांची राहिलेली नाही. गृहमंत्रालयाला केवळ एक ‘पॉवरफुल पद’ म्हणून न पाहता, ती जनतेच्या रक्षणाची एक मोठी जबाबदारी आहे, याचे भान सत्ताधाऱ्यांनी ठेवले पाहिजे. महाराष्ट्राला आज अशा गृहप्रमुखाची गरज आहे जो पूर्णवेळ केवळ आणि केवळ राज्याच्या सुरक्षेसाठी देईल; ज्याचा जरब गुन्हेगारांवर असेल, पोलिसांवर वचक असेल आणि जनतेला सुरक्षिततेची हमी देईल. देवेंद्र फडणवीस यांनी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, राजकीय महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून या अपयशाचे प्रायश्चित घ्यायला हवे आणि राज्याच्या हितासाठी एका सक्षम, पूर्णवेळ गृहमंत्र्याची नियुक्ती करावी, हाच या कोलमडलेल्या व्यवस्थेला रुळावर आणण्याचा एकमेव मार्ग आहे. अन्यथा, महाराष्ट्राची वाटचाल ‘जंगलराज’कडे व्हायला वेळ लागणार  नाही.

संपादक : प्रफुल गोरख कांबळे 

Email : yuvaprabhav@gmail.com 

👉 वाचा आणि शेयर करा 

👉 व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये जॉइन व्हा.

👉 नवनवीन आणि ताज्या घडामोडीसाठी साठी वाचत रहा.

www.YuvaPrabhav.Com

An Independent Marathi News Portal.