वाहनधारकांनो लक्ष द्या! जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ; अन्यथा १ हजार रुपये दंड

55

मुंबई : राज्यातील वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP – High Security Registration Plate) बसवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच होती.

परिवहन विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार, राज्यातील केवळ ५० टक्के जुन्या वाहनांवरच आतापर्यंत एचएसआरपी (HSRP) प्लेट्स बसवण्यात आल्याचे आढळून आले आहे. अजूनही अर्धी वाहने या प्रक्रियेपासून दूर असल्याने नागरिकांची धावपळ होऊ नये, या उद्देशाने शासनाने ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

१ जुलैपासून होणार कडक तपासणी आणि दंड

मुदत संपल्यानंतर परिवहन विभाग कोणतीही सवलत देणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे

ज्या वाहन मालकांनी ३० जून २०२६ पर्यंत आपल्या वाहनांवर HSRP प्लेट बसवलेली नसेल किंवा त्यासाठी आगाऊ वेळ (Appointment) घेतलेली नसेल, अशा वाहनांची १ जुलै २०२६ पासून रस्त्यावर कडक तपासणी केली जाईल.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि जुनीच नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनधारकांकडून मोटार वाहन कायद्यानुसार १,००० रुपये तडजोड शुल्क (दंड) आकारण्यात येणार आहे.

ऑनलाईन अपॉईंटमेंट कशी घ्यावी?

वाहन मालकांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी परिवहन विभागाने आवाहन केले आहे. सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (transport.maharashtra.gov.in) जाऊन ३० जून २०२६ पूर्वी आपली ऑनलाईन अपॉईंटमेंट निश्चित करावी.

“अंतिम मुदतीची वाट न पाहता वाहनधारकांनी लवकरात लवकर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवून घ्यावी, जेणेकरून १ जुलैपासून होणारी दंडात्मक कारवाई टाळता येईल.” – परिवहन विभाग, महाराष्ट्र शासन

नवनवीन अपडेट्ससाठी वाचत राहा ‘युवा प्रभाव’ – तरुण भारताचा नवा आवाज!