पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरात रात्री आरपीआय (आठवले गट) कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या (Anil More killed in Pimpri Chinchwad) केली आहे. मोशी येथील ‘युवराज रेस्टॉरंट अँड बार’मध्ये काल रात्री सुमारे नऊच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये मधे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल मोरे हे मोशी येथील रेस्टॉरंटमध्ये बसलेले असताना अचानक काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त केलेली आहेत.
दरम्यान, अनिल मोरे यांचा मृतदेह पिंपरी येथील वायसीएम (YCM) रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ह्या घटनेनंतर आरपीआय कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली आहे.
या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. प्राथमिक तपासात ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे, तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.






