बौध्द धम्माचे सुसंस्कार अंगी लावून घेण्यासाठी बुध्द उत्सव साजरा करा – सागर तायडे

860

कोल्हापूर – पंचशील असो अथवा बौध्द धम्माचे कोणतीही कृती असो असे सुसंस्कार अंगी लावून घेेण्यासाठी सम्राट अशोक कालिन असलेला घरगुती बुध्द उत्सव हा एक चांगला पर्याय असल्याचे प्रतिपादन मुंबईतील ज्येष्ठ साहित्यिक, कामगार नेते सागर तायडे यानी आज बुधवारी तिळवणी (ता.हातकणंगले जि.कोल्हापूर) येथील रामचंद्र चव्हाण गुरूजी यांच्या घरी बुध्द उत्सव निमित्त आयोजित केलेल्या धम्मदेसना कार्यक्रमात केले. अध्यक्षस्थानी दैनिक मुक्तनायकचे संपादक देवदास बानकर होते.

सन 2015 साली दैनिक मुक्तनायकचे संपादक देवदास बानकर यानी आपल्या घरातून सम्राट अशोक कालिन बुध्द उत्सवाला प्रारंभ केला. त्यावेळी अनेकांनी शंका घेतली. हा कुठून आणला उत्सव असे लोक म्हणू लागले. पण जेव्हा लोक उत्सवाचा इतिहास वाचू लागले तेव्हा त्याना हा उत्सव होता याची खात्री पटली. आज मुंबई, पुणे, जालना, औरंगाबाद, भंडारा, बुलडाणा आदी भागातील बुध्दधम्म प्रेमी हा उत्सव साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने घरी धम्मदेसनाचे आयोजन करून धम्मातील सुसंस्कृतीचा प्रचार करत आहेत, स्वतःवर कुटुंबातील सदस्यांवर अधिकाधिक संस्कार निर्माण करून घेत आहेत.

यावेळी सागर तायडे यानी आजच्या कामगार संघटना व तथागतांनी स्थापन केलेल्या संघाची सांगड घालून कामगारांनी संघटित झाले पाहिजे असे सांगितले. पंचशील पालन करणारे कर्मचारी अधिकारी निर्माण झाले तर ते कुणाची फसवणूक करणार नाहीत. ते सर्व समाजाच्या माणसांना माणसासारखी वागवणूक देती,राज्य व केंद्र सरकारच्या सामाजिक कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी प्रामाणिक पणे करतील तेव्हाच बहुजन हिताय बहुजन सुखाय ही बुद्धाची शिकवण आपल्यावर चांगले संस्कार निर्माण करण्यासाठी बुध्द उत्सव हा एक चांगला पर्याय असल्याचे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात संपादक बानकर यानीही स्वतःला बौध्द समजणार्‍यांनी बुध्द उत्सव का साजरा केला पाहिजे यावर भाष्य केले.

लग्न आणि मरणोत्तर विधीसाठी धम्माचा वापर होण्याने धम्माचा प्रसार होणार नसल्याचे ते म्हणाले. प्रारंभी सामुहिक वंदना घेण्यात आली. प्रास्ताविक व स्वागत रामचंद्र चव्हाण यानी केले. देसना कार्यक्रमाला भागातील उपासिका व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.