लाख खंडाळा खून प्रकरण: दलित कुटुंबावर सशस्त्र हल्ला; युवकाचा निर्घृण खून….

जिवाला धोका असल्याची शुक्रवारी दिली होती तक्रार; पोलिसांविषयी संताप.

1184

वैजापूर : आपल्या मुलीला पळवून नेल्याच्या संशयातून लाख खंडाळा येथील देविदास छगन देवकर, रोहिदास छगन देवकर या भावांनी एका दलित कुटुंबावर शनिवारी रात्री सशस्त्र हल्ला केला. त्यात भीमराज बाळासाहेब गायकवाड (१७) या दलित युवकाचे झाेपेतच मुंडके छाटून सूड उगवण्यात अाला. या हल्ल्यात भीमराजचे वडील बाळासाहेब अाणि अाई अलकाबाई या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मृत भीमराजच्या वडिलांनी १३ मार्च रोजी वैजापूर पोलिसांसह जिल्हा पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन आपल्या जिवाला धोका असल्याचे कळवले होते. मात्र, पोलिसांनी या तक्रारीची दखलच घेतली नसल्याने एका निरपराधाचा बळी गेला आहे हे सिद्ध होत आहे.

सविस्तर वृत्त असे कि, लाख खंडाळा येथे शेतवस्तीवर राहणारे बाळासाहेब गंगाधर गायकवाड यांचा मुलगा अमोल (२२) हा वैजापुरात केटरिंगचे काम करतो. तो १२ मार्च रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घरच्यांना केटरिंगच्या कामावर जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र तो परतलाच नाही. त्याच दिवशी गायकवाड वस्तीच्या शेजारी असलेल्या देवकर वस्तीवरील देविदास देवकर यांची मुलगीही बेपत्ता झाली होती. अमोल यानेच तिला पळवल्याचा संशय देवकरला होता. याच संशयावरून शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास देविदास देवकर आणि त्याचा लहान भाऊ रोहिदास देवकर हे गायकवाड यांच्या वस्तीवर आले. त्यांनी बाळासाहेब गायकवाड आणि पत्नी अलकाबाई यांना अमोलबाबत विचारणा केली. त्यानंतर त्यांच्यावर तलवार आणि कोयत्याने हल्ला चढवला. त्याच वेळी या भावंडांनी घरात झोपलेल्या भीमराज गायकवाड याच्यावर हल्ला केला. झोपेतील भीमराज याची मान धडापासून वेगळीकरत त्याची क्रूर हत्त्या केली.

या घटनेमुळे गायकवाड यांच्या नातलगांसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक झाले होते. हल्ल्यापूर्वी आरोपींनी त्यांच्या घरातील सामान तालुक्यातील एका नातलगाच्या घरी रवाना करून हे हत्याकांड घडवून आणले. या कटात आरोपीची संख्या अधिक आहे. त्यांना त्वरित अटक करा, अशी भूमिका राजेंद्र बागूल, रिपाइंचे तालुकाध्यक्ष साहेबराव पडवळ, बसपाचे बाबासाहेब पगारे, शहराध्यक्ष बाळासाहेब त्रिभुवन यांनी घेतली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाळ रांजणकर, पो. नि. अनंत कुलकर्णी, फौजदार अमोल ढाकणे, संजय घुगे यांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातलगांनी मृतदेह ताब्यात घेतला.

वैजापूर पोलिसांनी रविवारी पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान देविदास आणि रोहिदास या दोन्ही हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. रविवारी सकाळी या दोघांवर खुनाच्या गुन्ह्यासह अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा नोंदवला.

अमोल आणि ती तरुणी १२ मार्चपासून बेपत्ता झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता देविदासचा मुलगा सागर याने आमच्या कुटुंबीयांना जिवंत मारण्याची धमकी दिल्याची तक्रार बाळासाहेबांनी १३ मार्च रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी, वैजापूर ठाण्यात केली होती. पोलिसांनी दखल घेतली नाही.