Mulund | हरी ओम नगर रहिवाश्यांना टोल माफी द्या, अन्यथा मतदान करणार नाही. सरकारला दिला थेट इशारा.

41

Mumbai : तांत्रिकदृष्ट्या BMC हद्दीत येणाऱ्या आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावणाऱ्या हरिओम नगरने टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा सरकारला दिला आहे.

हरी ओम नगर ही ठाणे आणि मुलुंड शहराच्या मध्ये कोपरी गाव लगतची वसाहत आहे. मात्र इथे राहणारे रहिवाशी मुंबई शहरात मोडतात. त्यांचा टॅक्सदेखील मुंबई महानगरपालिकेत जातो. त्यामुळे मुंबईचा पत्ता असल्याने हरी ओम नगरपासून जवळच असलेल्या मुंबई एन्ट्री पॉइंट टोल नाक्यावर या रहिवाशांकडून टोल वसूल केला जातो.

त्यामुळे रहिवाशांचे म्हणणे आहे की, प्रत्येक वेळी जेव्हा ते मुंबईतून बाहेर पडतात तेव्हा त्यांच्याकडून टोल आकारला जातो. संपूर्ण टोलमाफीची त्यांची मागणी ही एका दशकापासून अनुत्तरीत आहे. त्यामुळे या रहिवाशांनी निराश होऊन NOTA ला मतदान करण्याची धमकी दिली आहे.

या जागेवरील भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा, जे मुलुंडचे आमदार आहेत, ते म्हणाले की त्यांनी हा मुद्दा राज्य सरकारकडे मांडला आहे आणि MSRDC ने अलीकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) 100% टोलमाफीचा प्रस्ताव पाठवला आहे.

आमदार झाल्यानंतर हा मी पहिला मुद्दा उपस्थित केला होता. मी या विषयावर राज्य सरकार आणि एमएसआरडीसी यांच्याशी सतत संपर्कात होतो आणि शेवटी तो निष्कर्षापर्यंत पोहोचत आहे. एमएसआरडीसीने नुकताच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. आम्ही सरकारला विनंती करू की, या प्रस्तावावर विचार करावा आणि हरिओम नगर रहिवाशांना 100% टोलमाफी मंजूर करावी. याबाबत मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून त्यांनीही या विषयाला पाठिंबा दिला असल्याने मी त्यावर कार्यवाही करून ते पूर्ण करेन, असे कोटेचा यांनी सांगितले.

एमएसआरडीसीने पीडब्ल्यूडीला पाठवलेल्या प्रस्तावानुसार, हरिओम नगरच्या रहिवाशांना आधीच टोलसाठी मासिक पासमध्ये सूट मिळते. इतर प्रवाशांसाठी, एका टोल नाक्यावर मासिक पास 1,410 रुपये आहे, तर हरिओम नगर रहिवाशांसाठी तो केवळ 353 रुपये आहे. त्याचप्रमाणे, पाचही टोल नाक्यांवर सर्वसामान्यांसाठी 1,600 रुपये आणि हरिओम नगर रहिवाशांसाठी 400 रुपये दरमहा आहे. हे दर सप्टेंबर 2026 पर्यंत वैध राहणार आहेत.