अग्रलेख | आंबेडकरी पक्ष जिवंत राहिला पाहिजे तरच ह्या भारतातील लोकशाही टिकेल…

79

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच अनुषंगाने ही निवडणूक महत्वाची असणार आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांचे मित्रपक्ष (एनडीए) यांनी ४०० जागा जिंकण्याचे उद्दिष्ठ समोर ठेवले आहे. त्यांना काँगेस सहित इतर पक्षाच्या (इंडिया) आघाडीने जोरदार आव्हान निर्माण केले आहे. महाराष्ट्रात महायुती आणि आणि महाविकास आघाडी अशी लढत सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आंबेडकरी नेते, पक्ष आणि जनतेची तारांबळ उडली असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच तथाकथित आंबेडकरी विद्वान, लेखक यांची भूमिका आणि त्यामुळे सर्वच पातळीवर आंबेडकरी समाजात संभ्रमाचे वातावरण आहे. यावर आंबेडकरी जनतेने काय करायचे असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.

आपण रामदास आठवले यांनी केलेली शिर्डी लोकसभा मतदार संघाची मागणी त्यावर महायुतीने काय केले हे सर्व पाहिले. मग वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील बोलणी, त्यातील चर्चा, वाटाघाटी बघितल्या. रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजातील सर्वात मोठे नेते. यांच्या बाबतीत महाविकास आघाडी आणि महायुती ने जी अपमानास्पद वागणूक दिली याचा तर सर्वप्रथम आपण सर्वांनी मिळून निषेध केला पाहिजे. बरे ह्या दोन मोठ्या नेत्यांची ही अवस्था तर इतर नेते, कार्यकर्ते यांना काय वागणूक मिळत असेल याचा आपण थोडा विचार करायला हवा.

एकंदरीत काय तर आंबेडकरी समाजाला आणि आंबेडकरी नेत्यांना ही इथली व्यवस्था दुय्यम वागणूक देते.

का महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडी बरोबर सन्मानजनक आघाडी केली नाही? भाजपला हरवायचे होतेच तर मग आंबेडकरी समाजाचा, चळवळीतला उमेदवार का दिला नाही.?

शिवसेना (उबाठा गट) राष्ट्रवादी (शरद पवार गट) निवडणुकीनंतर आणि भविष्यात भाजपा सोबत जाणार नाहीत असे शपथपत्र महाराष्ट्रातील जनतेला देतील का? ह्या दोन पक्षांनी काँग्रेसची गोची करून टाकली आहे. राहूल गांधी राब राब राबतोय. त्याच्या मेहनतीवर हे दोन्ही पक्ष आपले आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहेत. काँग्रेसच्या हक्काच्या निवडून येणाऱ्या जागांवर ह्यांनी आपले उमेदवार उभे केले. ह्यांची अनामत रक्कम राहील की नाही हीच आता शंका आहे.

लोकशाही, आरक्षण ,राज्यघटनेचे रक्षण संवर्धन करणे ही आपले आद्य कर्तव्य आहेच. दरम्यान ह्या सर्व पार्श्वभूमीवर एक प्रश्न उपस्थित होतो की, लोकशाही वाचवण्याचा ठेका फक्त आंबेडकरी समाजानेच घेतला आहे का? मग आंबेडकरी चळवळीतला उमेदवार का नाही दिला.? असा जाब महाविकास आघाडीला का नाही विचारायचा.? त्यामुळे उगाच आंबेडकरी व समाजाने विचलित न होता, कोणत्याही भुलथापाना बळी न पडता विचार केला पाहिजे. आंबेडकरी विचारांचे उमेदवार पडता कामा नये. एक गठ्ठा मतदान आपल्या माणसाला आणि आपल्या पक्षालाच करा. कारण आंबेडकरी चळवळ जिवंत राहिली पाहिजे. आंबेडकरी पक्ष जिवंत राहिला पाहिजे तरच ह्या भारतातील लोकशाही जिवंत राहील..

प्रफुल गोरख कांबळे

Editor –In- Chief : www.YuvaPrabhav.com

Email : kampraful@gmail.com

(आपण आपल्या प्रतिक्रिया वरील मेल वर पाठवू शकता. लेखातील मुद्दे आवडल्यास लाईक आणि शेयर करा. जेणेकरून लेखप्रपंच सार्थकी लागेल…)

www.YuvaPrabhav.Com हे एक स्वतंत्र मराठी वेब न्यूज पोर्टल आहे. Google Play Store वरून YuvaPrabhav चे मोबाईल application डाऊनलोड करा. आम्हाला ट्विटर, फेसबुक वर फॉलो करा. WhatsApp News group मध्ये सामील व्हा. ही विनंती.

आपला प्रफुल कांबळे.