Mulund. : डान्सबारची पोलिसांना खबर दिल्याचा संशय; बार मालकाकडून एकाला बेदम मारहाण..

164

Mumbai : मुलुंड येथील चांदणी बार मालकाने पोलीस खबऱ्याला एका खोलीत कोंडून ठेवून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी बार मालकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. बार मध्ये सुरू असलेल्या डान्स बारची पोलिसांना खबर दिल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

मरीन ड्राईव्ह येथे राहणाऱ्या तक्रारदार (पोलीस खबरी) याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, तो अधून मधून स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी मुलुंड पश्चिम डपिंग रोड येथील चांदणी या डान्सबारमध्ये येत असतो. मार्च महिन्यात देखील तो चांदणी बार मध्ये स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी आला होता, त्यानंतर काही वेळाने तो तेथून निघून गेला आणि त्याच वेळी समाजसेवा शाखेने ‘चांदणी’बार वर छापा टाकला होता.

चांदणी बार (Chandni Bar) वरील छापा हा मी दिलेल्या माहितीवरून टाकण्यात आला असा संशय बार मालक चौधरी यांना होता. ६ एप्रिल रोजी तक्रारदार हा पुन्हा मनोरंजनासाठी चांदणी बार मध्ये गेला होता, त्यावेळी बार मालकाने बारच्या बाहेरच त्याला पकडले व दोन जणांच्या मदतीने त्याचा मोबाईल फोन ताब्यात घेऊन त्याला एका खोलीत कोंडून मारहाण केली, त्याच्या खिशातील काही रोकड देखील काढून घेण्यात आली असा आरोप तक्रारदार याने आपल्या तक्रारीत केला आहे. मारहाण केल्यानंतर बार मालकाने स्वतः त्याला रिक्षात बसवून ऐरोली येथे सोडून त्याचा मोबाईल त्याला ताब्यात देऊन निघून गेला अशी तक्रारीत म्हटले आहे. जबर मारहाण झाल्यामुळे जखमी झालेल्या तक्रारदार यांच्यावर तब्बल १५ दिवस उपचार सुरू होते, व १५ दिवसांनी तो मुलुंड पोलीस (Mulund Police) ठाण्यात तक्रार देण्यासाठी आला. मुलुंड पोलिसांनी या प्रकरणी चांदणी बार मालक चौधरी सह चार जणांविरुद्ध जबरी चोरी, एका खोलीत कोंडून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून मालक चौधरीसह तिघांना सोमवारी अटक करण्यात आली आहे.