सातारा : सोशल मीडियावर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात भूमिका मांडणाऱ्या साताऱ्यातील शीतल दनावले या महिलेला भाजप कार्यकर्त्यांकडून त्रास दिला जात असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत राज्य सरकार आणि सातारा पोलिसांचे लक्ष वेधले आहे.
सचिन सावंत यांच्या दाव्यानुसार, शीतल दनावले या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपला अडचणीत आणणारे व्हिडिओ पोस्ट करतात. याच कारणावरून भाजपचे कार्यकर्ते त्यांना मानसिक त्रास देत असून, त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रारी केल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर, त्यांच्या कुटुंबीयांवरही दबाव आणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना सचिन सावंत यांनी भाजपवर कडक शब्दांत टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की एकीकडे पंतप्रधान मोदी महिलांना न्याय देण्याची भाषा करतात, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात भाजप कार्यकर्ते एका महिलेचा छळ करत आहेत.
मणिपूर, हाथरस आणि महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा उल्लेख करत सावंत यांनी भाजपचे ‘महिला प्रेम’ हे केवळ ढोंग असल्याचे म्हटले आहे. भाजपमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी नेत्यांची संख्या मोठी आहे आणि आता सामान्यांचा आवाज दाबण्यासाठी कार्यकर्ते खालच्या थराला जात आहेत.
शीतल दनावले यांनी स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली असून, “महिलांना न्याय देण्याच्या भाजपच्या दाव्यांचे वास्तव काय आहे,” हे स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, संबंधित महिलेच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी सातारा पोलीस आणि राज्य सरकारची आहे, असा इशारा सचिन सावंत यांनी दिला आहे.
“महिलांचा आवाज दाबण्यासाठी भाजप कार्यकर्ते कोणत्या थराला जात आहेत, हे साताऱ्यातील घटनेवरून स्पष्ट होते. – सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस
या प्रकरणी आता सातारा पोलीस काय भूमिका घेतात आणि सत्ताधारी पक्षाकडून यावर काय स्पष्टीकरण येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
https://x.com/i/status/2049354430995423271









