“बंद सम्राट”, माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन…

45

नवी दिल्ली : “बंद सम्राट” म्हणून ख्याती असलेले जेष्ठ कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी सकाळी दुःखद निधन झाले, ते 88 वर्षांचे होते. फर्नांडिस हे दीर्घकाळापासून आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटमध्ये उपचार सुरू होते. कामगारांचे नेते म्हणून जॉर्ज प्रसिद्ध आहेत. सुरवातीच्या काळात ते पत्रकार म्हणून कार्यरत होते. जॉर्ज यांचा नगरसेवक ते देशाचे संरक्षण मंत्री हा त्यांचा प्रवास संघर्षमयी होता. अल्झायमर आणि पार्किन्सन्स सारख्या आजाराने ते त्रस्त होते.

फर्नांडिस १९६७ मध्ये तत्कालीन दक्षिण बॉम्बेमधून काँग्रेसच्या स. का. पाटील यांना पराभूत करून ते पहिल्यांदा खासदार बनले होते. १९७५ च्या आणीबाणीनंतर फर्नांडिस बिहारच्या मुजफ्फरपूरमधून खासदार बनले होते. मोरारजी देसाई सरकारमध्ये ते उद्योग मंत्री होते. त्याशिवाय त्यांनी व्हीपी सिंह सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री पदावरही होते. अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार (1998-2004) मध्ये फर्नांडीस संरक्षण मंत्री होते. कारगिल युद्धाच्या काळातही ते संरक्षणमंत्री होते.

२००३ मध्ये विरोधकांनी कॅगचा च्या आधारावर जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर शवपेटी घोटाळ्याचे आरोप लावले होते. ऑक्टोबर 2015 मध्ये सुप्रीम कोर्टाने फर्नांडिस यांना या प्रकरणी निर्दोष ठरवले होते.