सैराट फेम “आर्ची” व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री रिंकु राजगुरूची प्रमुख भूमिका असलेला ‘कागर’ ह्या चित्रपटाचे प्रदर्शन लांबले आहे. रिंकुची बारावीची परीक्षा असल्याने व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर कागर प्रदर्शित होणर नाही. त्यामुळे तिच्या फॅन्सना आता वाट पाहावी लागणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी ‘कागर’चे दिग्दर्शन केले आहे. ‘कागर’ या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. मूळचे अकलूजचे असलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मकरंद आणि रिंकु या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.
दोन वर्षानंतर रिंकुचा “कागर” हा चित्रपट येत असल्याने प्रचंड उत्सुकता आणि चर्चा आहे. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने कागर प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, फेब्रुवारीमध्येच रिंकुची बारावीची परीक्षा असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे.
रिंकू राजगुरू म्हणाली, “मला स्वतःला कागर विषयी प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने फॅन्सला भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार होती. मात्र, बारावीची परीक्षा असल्याने मला अभ्यासाला वेळ देणे आवश्यक आहे हे निर्मात्यांनी लक्षात घेतलं आणि १४ फेब्रुवारीला माझ्यासाठी चित्रपट प्रदर्शित करायचा नाही असं ठरवलं. त्यासाठी मला त्यांचे आभार मानावेसे वाटतात. पण आत्ता चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले असले, तरी लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल”.








