पुणे : ब्रिटिश सैन्यातील महार रेजिमेंटच्या शूरवीर सैनिकांनी केलेल्या पराक्रमाच्या स्मृतिप्रीत्यर्थ भीमा काेरेगाव येथे उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मंगळवारी राज्यासह देशाच्या वेगवेगळ्या कानाकाेपऱ्यातून तब्बल ४ ते ५ लाख अनुयायी आले हाेते. गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराचे पार्श्वभूमीवर पुणे पाेलिसांनी या साेहळ्याच्या निमित्ताने चाेख बंदाेबस्ताचे दाेन महिन्यांपासून नियाेजन केले हाेते. माेठा फाैजफाटा, सीसीटीव्ही, ड्राेनची नजर, मेटल डिटेक्टरने प्रत्येकाची तपासणी आणि गावात बाहेरील वाहनांना बंदी केल्याने हा कार्यक्रम यंदा निर्विघ्नपणे पार पडला. स्थानिक गावकऱ्यांनीही अनुयायांचे स्वागत केले. दरम्यान, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्यासह अनेक नेत्यांनी व लाेकप्रतिनिधींनीही हजेरी लावली.
अंदाजे पाच लाख पेक्षा अधिक अनुयायांनी लावली हजेरी
देशभरातून आलेल्या लाखो आंबेडकरी अनुयायांचा भीमसागर भीमा कोरेगावात उसळला होता. महार सैनिकांच्या पराक्रमाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ब्रिटिशांनी १८१८ मध्ये उभारलेल्या स्मृतिस्तंभाला अभिवादनासाठी सकाळपासून अनुयायी येत होते. यंदा अभिवादनास सुमारे ५ लाख पेक्षा अधिक लोक आल्याचे सांगण्यात आले. वढू येथे छत्रपती संभाजी महाराज व गाेविंद गायकवाड यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठीही गर्दी झाली हाेती.
लाखोंच्या संख्येने आलेली आंबेडकरी जनता गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देत विजय स्तंभ परिसरात येत होती. गेल्या वर्षी १ जानेवारीला या परिसरातील हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर यंदा गर्दी कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. महाराष्ट्राच्या सर्व भागांतून व गोवा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश आदी भागांतून प्रचंड संख्येने लोक दिवसभर येत राहिले. आंबेडकरी जनतेची शिस्त आणि पोलिस व पुणे जिल्हा प्रशासनाने ठेवलेली व्यवस्था यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. समता सैनिक दलाच्या निळ्या टोप्या घातलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनीही जनसमुदायाचे नियंत्रण केले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले, बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे भीमराज आंबेडकर व मीराताई आंबेडकर, भीम आर्मीचे चंद्रशेखर रावण, रोहित वेमुलाची आई राधिका आदींसह अनेक आंबेडकरी संघटनांचे नेते उपस्थित होते.








