मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथे ड्रॅगन पॅलेसच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘ड्रॅगन पॅलेस फेस्टिव्हल’ संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तथागत गौतम बुद्ध आणि महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म हा जगातील एकमेव असा विचार आहे, ज्याने तलवारीच्या बळावर नव्हे, तर प्रज्ञा, करुणा आणि शील या त्रिसूत्रीच्या माध्यमातून संपूर्ण जग जिंकले. भारताच्या भूमीतून उदयास आलेल्या या धम्मविचाराने भारत आणि जपान यांच्यात 2500 वर्षांचे सांस्कृतिक आणि वैचारिक मैत्रीचे नाते निर्माण केले.
इंटरनॅशनल निचिरेन-शू फेलोशिप असोसिएशन, जपानचे अध्यक्ष भंते कान्सेन मोचिदा हे वयाच्या 90व्या वर्षीही धम्मप्रसाराचे कार्य करत असून, जगभरातील तब्बल 5000 बौद्ध विहारांचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जपानी भाषेतून त्यांचे स्वागत केले व आभार मानले.
‘सेव्हन वंडर्स ऑफ बुद्धिस्ट वर्ल्ड’ प्रकल्प : ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख ॲड. सुलेखा कुंभारे आणि मॅडम ओगावा यांनी 27 वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपट्याचे आज तथागत बुद्ध यांच्या विचारांचे जागतिक केंद्र म्हणून रूपांतरित होत आहे. जपान, थायलंड, श्रीलंका, म्यानमार, व्हिएतनाम आदी 7 बौद्ध राष्ट्रांची वास्तुकला आणि सांस्कृतिक वारसा एकाच छताखाली दाखवणाऱ्या ‘सेव्हन वंडर्स ऑफ बुद्धिस्ट वर्ल्ड अंडर वन अम्ब्रेला’ या प्रकल्पासाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस मेट्रो कनेक्टिव्हिटी: पवित्र दीक्षाभूमीप्रमाणेच ड्रॅगन पॅलेस टेम्पलने नागपूरला जगाच्या नकाशावर स्थान मिळवून दिले आहे. त्यामुळे येथील मेट्रो स्थानकाला ‘ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन’ असे नाव देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. या मेट्रोमुळे भाविकांना दीक्षाभूमीवर दर्शन घेतल्यानंतर त्वरित ड्रॅगन पॅलेसलाही भेट देणे सोपे झाले आहे.
भारत-जपान शैक्षणिक व सांस्कृतिक सहकार्य: जपानमधील 1200 वर्षांचा इतिहास असलेल्या कोयासान विद्यापीठात महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला असून, याच विद्यापीठाकडून मानद ‘डी.लिट.’ (D.Litt.) पदवी मिळाल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ही पदवी माझ्यासाठी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांचा आशीर्वाद आहे. आगामी काळात भारत आणि जपानमधील विद्यापीठे एकत्र येऊन बौद्ध साहित्याचे भाषांतर, प्राचीन वारशाचे दस्तऐवजीकरण आणि सामाजिक समरसतेचा विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवतील.
यावेळी आमदार डॉ. राजीव पोतदार, टोकियो, जपान येथील मिनोबुसान कुओनजी टेम्पलचे प्रमुख भंते ताईकेन ओयामा, इंटरनॅशनल त्रिपिटिका चॅन्टिंग सेरेमनी, महाबोधी विहार, बुद्धगयाच्या चीफ पॅट्रन मॅडम वांग्मो डिक्सी व इतर मान्यवर उपस्थित होते.








