पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञान : रोजगार, संशोधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे करिअर

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) : ज्ञान, विज्ञान आणि आत्मनिर्भरतेचा आश्वासक मार्ग

167

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीला पशुसंवर्धनाची भक्कम जोड मिळाली, तर ग्रामीण विकासाचे चित्र बदलू शकते. शेतीतील अनिश्चितता, हवामान बदल, पाण्याचे संकट आणि शेतमालाच्या बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. अशा परिस्थितीत दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, वराहपालन, मत्स्यव्यवसाय आणि इतर पशुधन आधारित व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला आर्थिक स्थैर्य देणारे महत्त्वाचे पर्याय ठरत आहेत. या सर्व क्षेत्रांच्या केंद्रस्थानी आहे पशुवैद्यकीय विज्ञान आणि आधुनिक पशुसंवर्धन! आज करिअर निवडताना तरुणाई समोर अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान अशा अनेक संधी आहेत. मात्र पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन या क्षेत्रातील अफाट संधींकडे अजूनही अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नाही. वास्तविक, प्राण्यांचे आरोग्य, अन्नसुरक्षा, दूध व मांस उत्पादन, मत्स्यसंपदा, जैवसुरक्षा, रोगनियंत्रण आणि ग्रामीण उद्योजकता या सर्वांचा संबंध पशुवैद्यकीय विज्ञानाशी आहे. त्यामुळे हे क्षेत्र केवळ पशुचिकित्सेपुरते मर्यादित नसून देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाशी जोडलेले आहे.

पशुवैद्यकीय व्यवसाय म्हणजे केवळ आजारी जनावरांवर उपचार करणे, एवढाच त्याचा अर्थ नाही. प्राण्यांच्या आरोग्याचे संरक्षण, रोगांचे निदान, प्रतिबंधात्मक लसीकरण, शस्त्रक्रिया, प्रजनन व्यवस्थापन, पोषण, आनुवंशिक सुधारणा आणि प्राणी कल्याण अशा अनेक महत्त्वाच्या शाखा या विज्ञानात समाविष्ट आहेत. आज कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान, जनुकीय संशोधन, आधुनिक निदान पद्धती आणि डिजिटल आरोग्य व्यवस्थापन यामुळे पशुवैद्यकीय क्षेत्रात नवनवीन क्षितिजे खुली होत आहेत. माणसाचे आरोग्य, प्राण्यांचे आरोग्य आणि पर्यावरणाचे आरोग्य हे परस्परांशी जोडलेले आहेत. याच विचारातून जागतिक स्तरावर ‘वन हेल्थ’ ही संकल्पना महत्त्वाची ठरली आहे. झुनोटिक म्हणजे प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारे रोग, अन्नसुरक्षा, प्रतिजैविकांचा योग्य वापर आणि साथीच्या रोगांचे नियंत्रण या आव्हानांवर मात करण्यासाठी पशुवैद्यकीय तज्ज्ञांची भूमिका निर्णायक आहे.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) हे महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यविज्ञान शिक्षणाचे महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. २००० मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण यांचा समन्वय साधणे हे विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विद्यापीठाच्या नागपूर, मुंबई, परभणी, उदगीर, शिरवळ आणि अकोला येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयांसह वरुड (यवतमाळ) व उदगीर येथे दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालये आणि नागपूर व उदगीर येथे मत्स्यविज्ञान महाविद्यालये तसेच नागपूर, सांगली आणि ठाणे येथे कृषी विज्ञान केंद्र आणि नागपूर च्या गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन प्रक्षिक्षण केंद्र तसेच व्हीआयपी रोड येथील शैक्षणिक पशुचिकित्सा संकुल (पॉलिक्लिनिक) या शिक्षणाशी संबंधित संस्थांमधून विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांच्या संधी उपलब्ध होतात. पशुवैद्यकीय पदवी, पदव्युत्तर शिक्षण, पीएच.डी., दुग्ध तंत्रज्ञान आणि मत्स्यविज्ञान अशा विविध क्षेत्रांत ज्ञान आणि कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यापीठ महत्त्वपूर्ण योगदान देते. माफसूची खरी ताकद केवळ पदव्या प्रदान करण्यात नसून, प्रयोगशाळा, पशुरुग्णालये, संशोधन केंद्रे, प्रक्षेत्रे आणि शेतकरी संपर्क कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यात आहे. वर्गखोलीतील ज्ञान प्रत्यक्ष शेतापर्यंत आणि संशोधनाचा लाभ ग्रामीण पशुपालकांपर्यंत पोहोचविणे हीच विद्यापीठाच्या कार्याची खरी कसोटी आहे.

बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पशुवैद्यकीय आणि संबंधित विज्ञान शाखांमध्ये करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील अभ्यासक्रम महत्त्वाचे आहेत.

१) बी.व्ही.एस्सी. अँड ए.एच. : पशुवैद्यकीय डॉक्टर होण्यासाठीचा प्रमुख पदवी अभ्यासक्रम. याचा कालावधी साडेपाच वर्षांचा असून त्यामध्ये अनिवार्य आंतरवासिता प्रशिक्षणाचा समावेश असतो. या शिक्षणातून पशुरोग निदान, औषधोपचार, शस्त्रक्रिया, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, पशुपोषण आणि पशुप्रजनन यांचे ज्ञान मिळते.

२) बी.एफ.एस्सी. : मत्स्यविज्ञान, मत्स्यपालन, जलसंवर्धन, मत्स्य प्रक्रिया आणि मत्स्यव्यवसाय व्यवस्थापन या क्षेत्रांत करिअर करण्याची संधी.

३) दुग्ध तंत्रज्ञान : दूध संकलन, प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, शीतसाखळी आणि दुग्ध उद्योग व्यवस्थापन यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ तयार करणारा अभ्यासक्रम.

४) पदव्युत्तर आणि संशोधन शिक्षण : एम.व्ही.एस्सी., एम.एफ.एस्सी., दुग्ध तंत्रज्ञानातील पदव्युत्तर शिक्षण आणि पीएच.डी.च्या माध्यमातून अध्यापन, संशोधन, रोगनिदान, पशुपोषण, आनुवंशिकता आणि जैवतंत्रज्ञान अशा क्षेत्रांत विशेषज्ञ होता येते.

या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पात्रता, प्रवेश परीक्षा, आरक्षण, जागा आणि प्रवेशप्रक्रिया यांचे नियम अभ्यासक्रमानुसार वेगवेगळे असतात. पशुवैद्यकीय पदवीसाठी NEET-UG आणि संबंधित प्रवेश नियमांची माहिती अधिकृत प्रवेश पुस्तिकेत व माफसू च्या अधिकृत संकेतस्थळावरून तपासता येईल. पशुवैद्यकीय पदवीधरांसाठी राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग, शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालये, जिल्हा परिषद, संशोधन संस्था, खासगी पशुवैद्यकीय दवाखाने, पशुऔषधनिर्मिती कंपन्या, पशुखाद्य उद्योग, लसी उत्पादन संस्था, प्रयोगशाळा आणि शैक्षणिक संस्था अशा विविध ठिकाणी संधी उपलब्ध होतात. पदव्युत्तर आणि पीएच.डी. शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना संशोधन, अध्यापन, वैज्ञानिक संस्था आणि विशेष तज्ज्ञ सेवांमध्ये पुढे जाण्याची संधी असते. मत्स्यविज्ञान क्षेत्रात मत्स्यपालन प्रकल्प, हॅचरी, मत्स्य प्रक्रिया उद्योग आणि जलसंपदा व्यवस्थापन, तर दुग्ध तंत्रज्ञानात दूध प्रक्रिया प्रकल्प, गुणवत्ता नियंत्रण, उत्पादन विकास आणि दुग्ध उद्योग व्यवस्थापन यांसारख्या संधी आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पदवी मिळाली म्हणजे रोजगाराची हमी मिळाली, असे नाही. प्रत्यक्ष कौशल्य, अनुभव, संवादक्षमता, तांत्रिक ज्ञान आणि सातत्यपूर्ण अद्ययावत शिक्षण यांवर व्यावसायिक यश अवलंबून असते.

आजच्या तरुणांनी केवळ शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत राहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा विचार केला पाहिजे. आधुनिक पद्धतीने दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, पशुखाद्य निर्मिती, दूध प्रक्रिया, सेंद्रिय खत निर्मिती आणि पशुपालन सल्ला सेवा या क्षेत्रांत उद्योजकतेच्या संधी आहेत. विदर्भ आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागात दुग्धव्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालनाला मोठी क्षमता आहे. मात्र व्यवसाय सुरू करताना बाजारपेठेचा अभ्यास, पशुधनाची निवड, रोगप्रतिबंध, पशुखाद्य व्यवस्थापन, विमा, भांडवल आणि विक्री व्यवस्था यांचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. शासनाच्या विविध योजना आणि बँकांच्या कर्जसुविधांची माहिती घेऊन प्रशिक्षणासह व्यवसाय सुरू केल्यास तरुणांना स्वावलंबनाचा मार्ग खुला होऊ शकतो.

संशोधन आणि तंत्रज्ञान हीच भविष्याची खरी दिशा आहे. पशुसंवर्धन क्षेत्राचे भविष्य आता पारंपरिक पद्धतींपुरते मर्यादित राहिलेले नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान, सेन्सर आधारित पशुआरोग्य निरीक्षण, डिजिटल पशुवैद्यकीय नोंदी, जनुकीय सुधारणा आणि आधुनिक रोगनिदान पद्धती यामुळे या क्षेत्रात मोठे परिवर्तन घडत आहे. जनावरांच्या शरीरातील बदलांची पूर्वसूचना देणारे तंत्रज्ञान, दूध उत्पादनाचे डिजिटल व्यवस्थापन, रोगांचा प्रादुर्भाव ओळखणाऱ्या प्रणाली आणि आधुनिक प्रजनन तंत्रज्ञान यामुळे उत्पादकता वाढविण्यास मदत होत आहे. भविष्यात पशुवैद्यकीय विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान यांचा संगम अधिक व्यापक होणार आहे. माफसूनेही संशोधनाला अधिक गती देत विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जोडले पाहिजे. विद्यापीठातील संशोधन केवळ संशोधनपत्रिकांपुरते मर्यादित न राहता त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकरी, पशुपालक, मत्स्यव्यावसायिक आणि ग्रामीण उद्योजकांपर्यंत पोहोचला पाहिजे.

त्याचप्रमाणे विस्तार शिक्षण विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यातील विश्वासाचा पूल आहे. शिक्षण आणि संशोधनाइतकेच विस्तार शिक्षण महत्त्वाचे आहे. विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही, तर त्या संशोधनाचा सामाजिक उपयोग मर्यादित राहतो. गावोगावी पशुआरोग्य शिबिरे, लसीकरण मोहिमा, पशुपालक प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, शेतकरी मेळावे आणि आधुनिक पशुपालन पद्धतींचे मार्गदर्शन यांना अधिक प्राधान्य मिळाले पाहिजे. विदर्भातील दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी तज्ञ डॉक्टर, आधुनिक उपचार सुविधा आणि वेळेवर औषधोपचार उपलब्ध नसतात. अशा भागांसाठी मोबाइल पशुवैद्यकीय सेवा, टेलिमेडिसिन आणि आपत्कालीन उपचार व्यवस्था प्रभावी ठरू शकते. विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष समस्या समजून घेऊन संशोधनाचे विषय निश्चित केले पाहिजेत. प्रयोगशाळेतील ज्ञान जेव्हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवते, तेव्हाच विद्यापीठाच्या संशोधनाचे खरे सार्थक होते.

माफसू हे केवळ शैक्षणिक संस्था नसून महाराष्ट्राच्या पशुसंपत्ती विकासाचे महत्त्वपूर्ण ज्ञानकेंद्र आहे. त्यामुळे विद्यापीठासमोर काही मूलभूत अपेक्षा आहेत. आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज पशुरुग्णालये, अत्याधुनिक निदान सुविधा, अनुभवी प्राध्यापक, संशोधनासाठी पुरेसा निधी आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण या बाबींना सर्वोच्च प्राधान्य मिळाले पाहिजे. उद्योग आणि विद्यापीठ यांच्यातील सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप, रोजगाराभिमुख प्रशिक्षण, स्टार्टअप मार्गदर्शन आणि संशोधन प्रकल्प उपलब्ध करून दिले पाहिजेत. विद्यापीठाचे माजी अधिकारी व विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा उपयोग करून रोजगार निर्मितीचे नेटवर्क उभे करणेही आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेत गुण मिळविण्यासाठी नव्हे, तर समस्यांचे निराकरण करणारे संशोधक, संवेदनशील पशुवैद्यकीय डॉक्टर आणि सक्षम उद्योजक बनविण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न केले पाहिजेत. विद्यापीठाची प्रतिष्ठा केवळ पदवीधरांच्या संख्येवर ठरत नाही, तर समाजासाठी निर्माण केलेल्या ज्ञानावर आणि रोजगाराच्या संधींवर ठरते.

आजच्या तरुणांनी करिअर निवडताना केवळ सामाजिक प्रतिष्ठा किंवा पगाराचा विचार करू नये. आपल्या आवडी, क्षमता, विज्ञानाविषयीची जिज्ञासा आणि समाजासाठी योगदान देण्याची इच्छा यांचा विचार करावा. पशुवैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्राण्यांविषयी संवेदनशीलता, संयम, निरीक्षणशक्ती, मेहनत आणि प्रत्यक्ष काम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर होणे म्हणजे केवळ पांढरा कोट परिधान करणे नव्हे, तर मुक्या प्राण्यांच्या वेदना समजून घेण्याची आणि त्यांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारण्याची प्रतिज्ञा आहे. एखाद्या आजारी जनावराचे प्राण वाचविणे म्हणजे त्या जनावरावर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबाच्या उपजीविकेला आधार देणे होय. म्हणूनच पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञानाकडे दुय्यम करिअर म्हणून पाहण्याची मानसिकता बदलली पाहिजे. या क्षेत्रात ज्ञान आहे, संशोधन आहे, रोजगार आहे, उद्योजकता आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्याची क्षमता आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम करायचे असेल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे असेल आणि पशुधनाचे आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल, तर पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञानाला विकासाच्या केंद्रस्थानी आणावे लागेल. माफसूने शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून या परिवर्तनाचे नेतृत्व केले पाहिजे. सरकारने आवश्यक निधी, आधुनिक पायाभूत सुविधा आणि सक्षम मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. विद्यापीठ प्रशासनाने गुणवत्तेला प्राधान्य द्यावे आणि विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानासह जागतिक स्पर्धेसाठी स्वतःला तयार करावे. कारण आजचा पशुवैद्यकीय विद्यार्थी हा उद्याचा शास्त्रज्ञ, संशोधक, उद्योजक आणि ग्रामीण विकासाचा शिल्पकार ठरू शकतो. शेतीला पशुसंवर्धनाची जोड, विज्ञानाला संशोधनाची गती आणि तरुणाईला कौशल्याची साथ मिळाली, तरच आत्मनिर्भर महाराष्ट्राचे स्वप्न साकार होईल! माफसू सक्षम झाले, पशुसंवर्धन समृद्ध झाले आणि तरुणाई स्वावलंबी झाली, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल!

✍️ प्रवीण बागडे

साहित्यिक आणि सामाजिक विश्लेषक,

नागपूर

मो.क्र. ९९२३६२०९१९