नवी दिल्ली: ‘नीट’ (NEET-UG 2026) परीक्षा घोटाळा आणि पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर सुरू असलेले आंदोलन आता कमालीचे तापले असून आज या आंदोलनाचा सलग पाचवा दिवस आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि परीक्षामधील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) नेतृत्वाखाली सुरू असलेला हा लढा दिवसेंदिवस अधिक व्यापक होत चालला आहे.
या आंदोलनाला आता शैक्षणिक क्षेत्रातूनही मोठा पाठिंबा मिळत असून, आंदोलक मागे हटण्यास तयार नसल्याचे चित्र दिल्लीत पाहायला मिळत आहे.
दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापकांचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा
आंदोलनाच्या पाचव्या दिवशी या आंदोलनाला एक मोठी ताकद मिळाली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या (Delhi University) अनेक नामांकित प्राध्यापकांनी जंतर-मंतरवर येऊन विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. शिक्षण व्यवस्थेतील या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी शिक्षकांनीही आता विद्यार्थ्यांसोबत आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेत्यांनी पुन्हा एकदा आपला निर्धार व्यक्त केला असून, “जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि शिक्षणमंत्री राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील,” असा इशारा दिला आहे.
अभिजीत दिपकेंना ‘मेइती’ (MeitY) पुनर्विलोकन समितीसमोर हजर राहण्याचे आदेश
या आंदोलनादरम्यान एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य नेते अभिजीत दीपके यांना केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) पुनर्विलोकन समितीसमोर हजर राहण्याचे समन्स जारी करण्यात आले आहे.
‘X’ खाते रोखल्याचा वाद: आंदोलन सुरू झाल्यापासून कॉकरोच जनता पार्टीचे अधिकृत सोशल मीडिया ‘X’ (ट्विटर) खाते प्रशासनाकडून रोखून (Withhold) धरण्यात आले आहे.
समितीसमोर बाजू मांडणार: हे खाते कोणत्या कारणास्तव ब्लॉक करण्यात आले आहे, या संदर्भातील सुनावणीसाठी आणि पुनर्विलोकनासाठी अभिजीत दीपके हे ‘मेइती’च्या समितीसमोर हजर राहून आपली बाजू मांडणार आहेत.
एकीकडे विद्यार्थ्यांचे जंतर-मंतरवरील ठिय्या आंदोलन आणि दुसरीकडे आंदोलक नेत्यांची सोशल मीडिया खाती बंद करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रशासनाचा प्रयत्न, यामुळे हा संघर्ष आता न्यायालयीन आणि प्रशासकीय पातळीवरही लढला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.








