“ते” दहशतवादीच.. भगवा दहशतवादावर स्वरा भास्करचे परखड मत

143

शबरीमला प्रकरणावरून केरळमध्ये तीव्र आंदोलन झाले त्यामुळे तेथे तणावाची परिस्थिती आहे. महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याचा विरोध दर्शवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निदर्शने-आंदोलने करण्यात आली. या आंदोलनांना हिंसक वळण मिळाले असून केरळमधल्या नेडुमांगडू पोलीस ठाण्यावर चार गावठी बॉम्ब फेकण्यात आले. पोलिस ठाण्यावर गावठी बॉम्ब फेकणारे व्यक्ती आरएसएसशी संबंधित असल्याचे वृत्त आहे. या वृत्ताचा दाखला देत, नेहमीच परखड पणे सद्य घटनांवर आपले मत मांडणारी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने सोशल मीडियावरून टीका केली आहे. ‘पोलीस ठाणे अथवा कुठेही बॉम्ब फेकणाऱ्यांना दहशतवादीच म्हटले जाईल. भगवा दहशतवाद हा खरा आहे,’ अशा शब्दांत स्वराने आरएसएस आणि भाजपावर निशाणा साधला आहे.

केरळमधील सुप्रसिद्ध शबरीमला मंदिरातील वर्षानुवर्षे सुरु असलेली प्रथा अखेर बुधवारी मोडीत निघाली. शबरीमला मंदिरात बुधवारी पहाटेच्या सुमारास दोन महिलांनी प्रवेश करुन भगवान अय्यप्पांचे दर्शन घेऊन इतिहास घडवला. पण यानंतर राज्यातील परिस्थिती बिघडली आहे. केरळात जनजीवन विस्कळीत झाले असून राज्याचे पोलिस प्रमुख लोकनाथ बेहेरा यांनी राज्यव्यापी सतर्कता इशारा दिला आहे.