खुलताबाद तालुका कृषी कार्यालातील तीन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक, ACB ची कारवाई

177

छत्रपती संभाजी नगर : लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (ACB) केलेल्या कारवाईत जिल्ह्यातील कृषी कार्यालयातील तीन महत्त्वाचे अधिकारी (Agricultural Officer) आणि काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. कार्यालयातील सर्वांनाच अटक झाल्यामुळे या घटनेची जिल्हाभर चर्चा सुरू आहे. तसेच, सरकारी कृषी खात्यामध्ये किती अनागोंदी आणि सर्वसामान्यांची ससेहोलपट सुरु आहे हे पुन्हा एकदा पुढे आले आहे.

कृषी कार्यालयात विविध कामांसाठी लाच घेतली जात असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे प्राप्त झाली होती. प्राप्त तक्रारीवरुन एसीबीने केलेल्या कारवाईत हा धक्कादायक प्रकार पुढे आला.

एबीपी माझा या खासगी वृत्तावाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कर्तव्यावर असेलल्या अधिकारी आणि कर्मचाऱअयांना एसीबीने कारवाई करुन अटक केली आहे. ठिबक सिंचन साहित्याच्या डिलरचे स्टॉक रजिस्टर तपासण्यासाठी तसेच अनुदानप्राप्त 35 फाईलसाठी 24 हजार 500 रुपयांची लाच घेताना एसीबीने ही कारवाई केली.

धक्कादायक म्हणजे एसीबीने केलेल्या कारवाईत वर्ग दोन श्रेणीत मोडणाऱ्या तीन अधिकाऱ्यांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. यात एका कंत्राटी ऑपरेटरचाही समावेश आहे. तालुका कृषी अधिकारी शिरीष रामकृष्ण घनबहादुर (वय 49 वर्षे), मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे (57 वर्षे), बाळासाहेब संपतराव निकम (57 वर्षे) आणि कंत्राटी ऑपरेटर सागर नलावडे (वय 24 वर्षे) अशी एसीबीने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्वांवर लाच घेतल्याचा आरोप आहे.

विभागातील 35 शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेअंतर्गत कृषी ठिबक सिंचन साहित्य पुरविले होते. या साहित्याच्या डिलरचे रजिस्टर तपासण्यासाठी अधिकाऱ्यांकडून आर्थिक मोबदला नियमबाह्य पद्धतीने मागितला जात होता. याबाबत एका डिलरने एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीत कृषी विभागाचे अधिकारी प्रति फआईल 700 रुपये याप्रमाणे पैसे मागत होते. एकूण 35 फाईल होत्या. सर्व फाईल्सचे मिळून साधारण 24,000 रुपये इतकी रक्कम लाच म्हणून मागण्यात आली होती. परिणामी डीलरने एसीबीकडे तक्रार नोंदवली. अशी माहिती एसीबी ने दिली आहे.