प्रकाश आंबेडकर यांची मोठी घोषणा; तीन महिने सक्रीय राजकारणापासून दूर राहणार, नवीन प्रभारी अध्यक्षाची नियुक्ती..

423

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी, आज सकाळी फेसबुक लाइव्ह आणि दूर दृश्य व्हिडिओच्या माध्यमातून एक व्हिडीओ पोस्ट केला असून, एक मोठी घोषणा केली आहे. तसेच, कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही याद्वारे सूचना केली आहे.

यामध्ये त्यांनी, “वैयक्तीक कामासाठी मी सामाजिक आणि पक्षाच्या राजकीय, दैनंदिन कामकाजातून ३ महिन्यांसाठी दूर राहणार आहे. पण असे असले, तरी पक्ष चालला पाहिजे. आपण ज्या आंदोलनाची सुरुवात केली आहे, ते सुरु राहिले पाहिजे. ५ जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत आणि म्हणूनच निर्णय प्रक्रियेसाठी पक्षाला अध्यक्ष असला पाहिजे. त्यामुळे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदी रेखा ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली असून, महाराष्ट्र कमिटी त्यांना सहकार्य करेल”, असे आंबडेकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, आंबेडकर यांच्या या घोषणेनंतर, राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. आपल्या पक्षाच्या अध्यक्षांनी, असा निर्णय का घेतला, असा सवाल वंचितच्या कार्यकर्त्यांकडून विचारण्यात येत आहे. दुसरीकडे, “डॉ. अरुण सावंत महाराष्ट्र कमिटी, जिल्हा कमिटी आणि सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी आणि आगामी निवडणुकांच्या विजयासाठी रेखा ठाकूर यांना सहकार्य करावे,” असे देखील आवाहन आंबेडकर यांनी आपल्या व्हिडिओत कार्यकर्त्यांना केले आहे.