जरंडेश्वर कारखाना प्रकरण : अजित पवारांचं नाव येताच अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया…

296

अहमदनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाटगे यांच्या जरंडेश्ववर साखर कारखान्यावर ईडीने काल जप्तीची कारवाई केली आहे. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी अजित पवार यांचं देखील नाव समोर आलं आहे. यानंतर आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे म्हणाले की, जरंडेश्वर प्रकरणात अजित पवार यांचं नाव आता आलं आहे. याविषयी आम्ही कधीपासून बोलत आहे. मात्र, मी फकीर माणूस. माझं कोण ऐकणार. आता ईडीने लक्ष घातलं आहे म्हटल्यावर सर्व बाहेर पडेल.
तसेच आपल्या राज्यात सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात वाढली. त्याचंच अनुकरण देशाने केलं. परंतु सध्या हीच सहकार चळवळ मोडीत काढण्याचा डाव सुरू आहे. सहकार क्षेत्राचं खासगीकरण करण्याच्या डावामुळे हजारो शेतकरी देशोधडीला लागले आहेत. हा सर्वात मोठा धोका आहे, असं देखील अण्णा हजारेंनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, साखर कारखान्यांच्या अनेक मालकांनी बँकेतून कर्ज घेऊन बुडवलं आहे. त्यानंतर साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली असल्याची माहिती समजत आहे. यासंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी यापुर्वीच मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्याप्रमाणे मुंबई शाखेच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने गुन्हा दाखल करत ही कारवाई केली असल्याचं बोललं जात आहे.