बेळगाव तीव्र पडसाद : आधी पुस्तकातून इतिहास गायब, आता तर चक्क महाराजांची मूर्ती गायब…

432

बेळगाव : मनगुत्ती गावातील (ता. हुक्केरी) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटवल्याने ह्या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी सीमाभासह कोल्हापूर जिल्ह्यात उमटले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांनी पुतळा त्वरीत बसवावा अन्यथा बेळगावात जाऊन आंदोलन करु असा इशारा दिला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. स्थानिक ग्रामपंचायतीची त्यास परवानगी असतानाही कर्नाटक सरकारने पुतळा हटवला. सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलिस बंदोबस्तात पुतळा हटवण्यात आला. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवभक्त रविवारी (9 ऑगस्ट) कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार आहेत.

मागील काही दिवसांपासून कर्नाटकात सोशल मीडियावर अवमानकारक लिखाण, पुस्तकातून महाराजांचा इतिहास काढून टाकणें, आणि मूर्ती हटवणे असे अवमानकारक प्रकार वाढत आहेत, प्रशासनाने हे प्रकार वेळीच थांबवावेत, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांच्याबाबत झालेला अवमान शिवभक्त सहन करू शकत नाहीत. याचसाठी येत्या सोमवार दिनांक 10 ऑगस्टला महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.