निसर्ग चक्रीवादळ : बाधित कुटुंबांना होणार मोफत केरोसीनचे वाटप…

396

मुंबई : ३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला. या भागात अजूनही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाहीय. परिणामी तेथील बाधित कुटुंबांना दिवे लावण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून मोफत केरोसिनचे वाटप करण्यात येणार आहे.

राज्यातील इतर नुकसानग्रस्त जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांची मागणी असल्यास त्यांनाही केरोसिन पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

केंद्र शासनाने नैसर्गिक आपत्ती, मत्स्यव्यवसाय, धार्मिक समारंभ, यात्रा व मेळावे इत्यादी प्रयोजनांकरिता विनाअनुदानित दराचे केरोसिन राज्यास उपलब्ध करून दिले आहे.त्यानुंषगाने रायगड जिल्ह्यामध्ये ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रति कुटूंब मोफत केरोसिन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ७ लाख ६९ हजार ३३५ इतक्या शिधापत्रिकाधारकांना प्रतिशिधापत्रिका ५ लिटर केरोसिन वितरित करण्यासाठी विनाअनुदानित दराचे केरोसिन नियतन मंजूर करण्यात येत असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे.