अरविंद बनसोडे हत्याप्रकरण : नितीन राऊत यांनी बोलावली तातडीची बैठक, न्याय मिळवून देण्याची ग्वाही…

1099

नागपूर || “आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्त्यांच्या जाण्याने मला वैयक्तिक दु:ख झाले आहे. जगभरांत कृष्णवर्णिय बांधवांच्या हक्काचा लढा लढला जात असतांना आयु. अरविंद बनसोड सारख्या लढाऊ दलित कार्यकर्त्यांच्या जाण्याने विशेष यातना होत आहेत. सदर प्रकरणांत न्याय हा मिळणारच”, असा आशावाद राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे.

अरविन्द बनसोड यांच्या दु:खद निधनाचे वृत्त समजतांच चक्रीवादळग्रस्त कोकणचा दौरा आटोपून मी नागपुरात दाखल झालो आहे. उद्या एसपी, एसडीपिओ व तपास अधिकारी यांच्याबरोबर तातडीची बैठक घेवून आयु बनसोड आणि परिवारास न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही देखील नितीन राऊत यांनी दिली आहे.

दलित कार्यकर्ते अरविंद बनसोड आत्महत्या प्रकरणी विविध सामाजिक संघटना, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, आरोपीच्या अटकेची मागणी करत असून ह्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत आहेत. परंतु आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी व सद्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जवळचा असल्याने हे अरविंद बनसोड प्रकरण दाबले जात आहे. असा आरोप देखील होत आहे.

अरविंद बनसोड यांचा २७ मे रोजी मृत्यू झाला. अरविंद बनसोडे हे नागपूर शहरातील थडीपवनी येथील गॅस एजन्सीच्या पायऱ्यांवर बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. यावेळी त्यांच्या बाजूला किटकनाशकाची बाटलीही आढळून आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्या केल्याची नोंद केली आहे.

मात्र अरविंद बनसोड यांचा मृत्यू संशयास्पद असल्याबाबत वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील म्हटले होते. त्याचबरोबर पोलिसांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आरोपी मिथिलेश उमरकरला वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबण्यात येतंय. आरोपी राष्ट्रवादीचा पंचायत समिती सदस्य असून मिथिलेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांचा निकटवर्तीय असल्याचा खळबळजनक आरोप आज प्रकाश आंबेडकर यांनी केला.

आज ट्विटर वर देखील आंबेडकरी तरुणांनी #JusticeForArvindBansod हा ट्रेंड केला आणि प्रकरणाला वाचा फोडली. ह्याचाच परिणाम नितीन राऊत यांनी एसपी, एसडीपिओ व तपास अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली असून अरविंद बनसोडे प्रकरणात न्याय मिळवून देणार असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

लेख,बातम्या, प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी yuvaprabhav@gmail.com वर मेल कराव्यात.
योग्य व उत्कृष्ट लिखाणास आपल्या वेब पोर्टल वर प्रसिद्ध केल्या जातील… (संपादक)