काँग्रेसबरोबर असलेल्या सर्व चर्चेचे प्रस्ताव संपले : प्रकाश आंबेडकर

557

अकोला : काँग्रेसबरोबर असलेल्या सर्व चर्चेचे प्रस्ताव संपले आहेत. आज उद्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुखांची बैठक होणार आहे. त्यानंतर 48 उमेदवारांची यादी जाहीर केल्या जाईल, अशी घोषणा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या 22 उमेदवारांना काँग्रेसने स्वीकारावे, त्यांना त्यांच्या पक्षाचा एबी फॉर्म द्यावा. असा प्रस्ताव आपण काँग्रेसला दिला होता. हे 22 उमेदवार आमच्या पठडीतले नाही, असे म्हणून काँग्रेसने तो प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे आता काँग्रेससोबतच्या आघाडीची शक्यता नाही. राज्यात खऱ्या अर्थाने भाजपसेना व वंचित बहुजन आघाडी अशीच होईल, असे आंबेडकर म्हणाले.

सोलापूरसह सहा मतदारसंघातील कार्यकर्तांची इच्छा आहे आपण त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी. मात्र मी अकोला मतदारसंघ कसा सोडणार, असे सांगून त्यांनी अकोल्यातून निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले. तसेच माझ्या परिवारातील कुणीही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगून अंजलीताई आंबेडकर यांच्या अकोल्यातून लढण्याची शक्यता फेटाळून लावली.