लाल वादळ मुंबईच्या दिशेने रवाना…

596

नाशिक- किसान सभेने मागील वर्षी मंत्रालयावर काढलेल्या पायी मोर्चानंतर सरकारने दिलेल्या आश्वासनांची वर्षभरात अंमलबजावणी न केल्याने आता फडणवीस सरकारविरोधात किसान सभेने पुन्हा एकदा पायी मोर्चा काढला आहे. सरकारने प्रथमतः मोर्चाला परवानगी नाकारली व त्यांची अडवणूक केली. इतर जिल्ह्यांतून नाशिकला येणाऱ्या मोर्चेकऱ्यांच्या वाहनांनाही अडवण्याचे प्रयत्न झाले. राज्यभरातून कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल झाले. सर्वच प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर अखेर जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून चर्चा करण्याचा प्रयत्न शासनाने दुसऱ्या बाजूने सुरू ठेवला होता, परंतु महाजनांची शिष्टाई फोल ठरली. व शेतकऱ्यांच्या लाल वादळाने मुंबईकडे कूच केली.

या वेळी ‘पाणी आमच्या हक्काचे- नाही कुणाच्या बापाचे, या सरकारचे करायचे काय- लाल सलाम लाल सलाम, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा प्रचंड घोषणांनी संपूर्ण राज्यातून आलेल्या आदिवासी कष्टकरी, शेतकऱ्यांनी बसस्थानकाचा परिसर दणाणून सोडला. मागील वर्षी याच मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर मोर्चा काढला होता.