जैश ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर जिवंत, पाकिस्तानी मीडियाचा दावा…

579

इस्लामाबाद : सध्या मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असलेला जैश ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर जिवंत आहे असा दावा पाकिस्तानी मीडियाने केला. भारतात काही माध्यमांनी जैशचा प्रमुख ठार झाल्याचे जारी केले होते. भारतीय माध्यमांचा हा दावा पाकिस्तानी मीडियाने फेटाळून लावला आहे. जिओ उर्दू न्यूजने मसूदच्या कौटुंबिक सूत्रांचा दाखला देत तो ठार झालेला नाही असे म्हटले आहे. दरम्यान, पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहर जिवंत आहे किंवा नाही यासंदर्भात पाकिस्तान आणि भारतीय अधिकाऱ्यांनी अद्याप कुठलेही विधान केलेले नाही.

पाकिस्तानचे केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले, आम्हाला मसूद जिवंत आहे किंवा नाही यासंदर्भात सद्यस्थितीला माहिती नाही. मसूद पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील लष्करी रुग्णालयात दाखल आहे असेही सांगण्यात आले होते. भारतीय माध्यमांनी मसूदचा खात्मा झाल्याचे वृत्त जारी केले होते. तेव्हापासूनच भारतीय अधिकारी गुप्तचर सुत्रांच्या मदतीने या दाव्याची शहानिशा करत आहेत.