माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे काँग्रेसवर नाराज; पक्ष सोडण्याचे संकेत…

423

नाशिक: भीमशक्ती महाराष्ट्र राज्य संघटना मागील ४० वर्षांपासून काँग्रेस सोबत असून देखील सातत्याने डावलले जात असल्याने पक्ष सोडण्याचे सूतोवाच माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले आहे. भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी किंवा शासकीय पदांच्या नियुक्त्यामध्ये मागील १० वर्षांपासून डावलले जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव संघटना आता स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना करत असल्याचे चंद्रकांत हंडोरे यांनी आज जाहीर केले. शासकीय विश्रामगृहात भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेस सोडताना स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याचा अथवा राष्ट्रीय स्तरावरील समविचारी, धर्मनिरपेक्ष पक्षासोबत आघाडी करण्याचा पर्याय आपल्या समोर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष माजी महापौर अशोक दिवे, राहुल दिवे, बाळासाहेब शिरसाठ उपस्थित होते.