Mulund : महाराणा प्रताप चौकातील भुयारी मार्गाचा प्रस्ताव रद्द

24

Mulund : लाल बहादूर शास्त्री मार्गावरील महाराणा प्रताप चौकातील वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता याठिकाणी भुयारी मार्ग बांधण्याची मागणी होत होती. परंतु याठिकाणची भौगोलिक परिस्थिती पाहता भुयारी मार्गाचा प्रस्ताव गुंडाळण्यात आला असून याठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून आकाशमार्गिका म्हणजेच स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या महाराणा चौकांत तब्बल ३० कोटी रुपये खर्च करून हे स्कायवॉक बांधले जाणार आहे.

या चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी होत असते. या चौका लगतच महापालिकेची शाळा व बेस्ट बस डेपो असल्याने पादचाऱ्यांंची रहदारी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे विद्यार्थी, पालकांसह पादचाऱ्यांना या चौकातून रस्ता ओलांडणे जिकरीचे झाले आहे. पादचाऱ्यांसह विद्यार्थी पालकांना होणारा हा त्रास आणि त्यांची सुरक्षितता लक्षात घेता स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही याठिकाणी पादचारी भुयारी मार्ग बनविण्याची मागणी केली जात होती.

या मागणीच्या आधारे महापालिकेने तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करून याठिकाणी पादचारी भुयारी मार्ग बांधण्याची शक्यता तपासणीसह पडताळून पाहण्यासाठी अहवाल तयार केला. दरम्यान, जलअभियंता विभागाने, या चौकात भूमिगत जलवाहिन्या असल्याचे कळवल्याने या तांत्रिक सल्लागाराने भुयारी मार्गाचा पर्याय वगळून आकाशमार्गिका बांधण्याची शिफारस केली. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांच्याकडून पूल विभागाला पत्र प्राप्त झाले, त्यात एमएमआरडीएने (MMRDA) या चौकात प्रस्तावित मेट्रो लाईन-४ च्या सुपर-स्ट्रक्चरचे काम पूर्ण झाल्यानंतरच आपल्या विभागाच्यावतीने पादचारी पूल बांधला जावा आणि आणि पादचारी पुलाची एक बाजू नव्याने तयार होत असलेल्या मुलुंड नाका मेट्रो स्टेशनला जोडण्यात यावी असे कळविण्यात आले होते.

त्यानुसार तांत्रिक सल्लागाराने नव्याने बांधण्यात येणाऱ्या आकाशमार्गिकेचा अर्थात स्कायवॉकचा सविस्तर अंदाज खर्च तयार केला. या आराखड्याला एमएमआरडीएचे (MMRDA) ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या पूल विभागाने त्यासाठीची निविदा मागवली. या निविदेमध्ये मेसर्स ए.बी. इन्फ्राबिल्ड लि. ही कंपनी पात्र ठरली. या कंपनीने उणे २४.४८ टक्के दराने बोली लावून हे काम मिळवले. त्यामुळे या स्कायवॉकच्या बांधकामासाठी २४ कोटी ०२ लाख २४ हजार रुपये खर्च केले जाणार असून विविध करांसह ३० कोटी १ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. पावसाळा धरून पुढील दोन वर्षांमध्ये या स्कायवॉकचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.