जातीयवादाचा किडा, महाराष्ट्रात पुन्हा; धुळ्यात दलित समाजावर सामाजिक बहिष्कार….

333

Dhule : धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथील जातीयवादी घटनेने पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा एकदा कलंकित व्हावे लागले आहे. संपूर्ण दलीत समाजावर गावाने बहिष्कार टाकल्याने महाराष्ट्र हादरला आहे. २६ ऑगस्ट रोजी बैल पोळ्याच्या मिरवणुकीत जातीयवादी गावकऱ्यांनी दलीत समाजाला मिरवणुकीत येण्यापासून मज्जाव केला. त्यामुळे प्रचंड वादावाद झाल्यानंतर सर्व जातीयवादी समूहाने दलीत समाजाला लाठ्याकाठ्याने मारहाण देखील केली. दिनांक २८ ऑगस्टला संपूर्ण गावाने सभा घेवून दलित समाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

मेहेरगाव गावातील उच्च जातीय लोकांनी गावात बैठक घेवुन निर्णय घेतला की बौध्द समाजाला किराना देवु नये, सालदार शेतात कामाला ठेवु नये, न्हाव्हीने बौध्द लोकांचे दाढी कटींग करू नये. जो दुकानदार किराना देईल त्याला गावात बोलवुन चौकात ठोकायचे. असा निर्णय ह्या बैठकीत घेण्यात आला.

“महार कधी पासून बैल पोळा साजरा करायला लागले.” असा आक्षेप मेहेरगावतील उच्च जातीय लोकांनी घेतला. दलित समाजातील लोकांना अमानुषपणे लाठ्याकाठ्यानी मारहाण केली. पोलिसांनी गावातील उच्च जातीय लोकांवर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला. परंतु त्या सोबत दलित समाजातील लोकांनी गुन्हा मागे घ्यावा यासाठी त्यांच्यावर चक्क दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पुन्हा गाव सभा घेवून दलित समाजावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला.

मेहेरगावतील ह्या घटनेचा सर्वत्र जाहीर निषेध होत आहे. जातीयवादाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. दलित समाजावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. अट्रोसिटी चा गुन्हा मागे घेण्यात यावा म्हणून त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला गेला. ह्या सर्व प्रकारामुळे दलित समाजात प्रचंड असंतोष पसरला आहे. दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील दलित संघटनांकडून करण्यात येत आहे.