शौर्य दिन ! भीमा – कोरेगाव येथे लोटला निळा भीमसागर; विजयस्तंभाला लाखों भीमसैनिकांचे अभिवादन

112

Pune : १ जानेवारी २०२४ रोजी भीमा कोरेगाव येथे 206 वा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी सोमवारी पहाटेपासूनच लाखो भीमसैनिकांनी गर्दी केली होती. भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ भारताच्या इतिहासातील शौर्याचं प्रतिक आहे. शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला फुलांची सजावट करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी विजय स्तंभाला अभिवादन केले. तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील विजयस्तंभाला अभिवादन केले आहे.

शौर्यदिनानिमित्त राज्यभरातून अनेक भीमसैनिक रविवारी रात्रीच कोरेगाव-भीमा परिसरात दाखल झाले होते.

यावेळी फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त देखील ठेवला होता. पोलिसांसह आरोग्य सेवा, वाहतुक, पार्किंग, शौचायल अशा सर्व सुखसुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आल्या होत्या. वरिष्ठांच्या मदतीसाठी ३२०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ७०० होम गार्ड्स आणि SRPF च्या ६ तुकड्या तैनात करण्यात आल्यात. शिवाय आरोग्य सेवेसाठी २९ ठिकाणी आरोग्य कक्ष,५० रुग्णवाहिका, ९० तज्ञ डॉक्टर २०० आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली. २०६ वर्षांपुर्वी झालेल्या लढाईत महार समाजातील सैनिकांच्या पराक्रमुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाली होती. महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले होते. हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी लढाईच्या स्मरणार्थ भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभ बांधण्यात आला. त्यानंतर १ जानेवारी १९२७ ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.