केंद्र सरकारचा नवा कायदा, ट्रकचालक आक्रमक; नवी मुंबईत पोलिसांना जबर मारहाण.

153

Navi Mumbai : केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात केलेल्या सुधारणांमुळे वाहतूक व्यावसायिक संतप्त झाले आहेत. देशभरात या कायद्याला विरोध दर्शवला जात आहे. त्यामुळे ट्रक चालकांनी दुरुस्तीला विरोध करत देशभरात संप पुकारला आहे.

नवी मुंबईतही या कायद्याच्या विरोधात वाहन चालक रस्त्यावर उतरले आहेत. मात्र या आंदोलनाला नवी मुंबईत गालबोट लागलं आहे. उरण जेएनपीटी मार्गावर आंदोलन करणाऱ्या ट्रकचालकांनी पोलिसांना दगडाने आणि बांबूने मारहाण केली आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारीत केल्याने राज्यात मोठा वाद सुरु झाला आहे. या विरोधात अवजड वाहतूक करणारे ट्रक चालक रस्त्यावर उतरले आहेत. उरण जेएनपीटी मार्गावरही ट्रक चालकांनी रास्ता रोको करत आंदोलन सुरु केले आहे. मात्र यावेळी पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला असता संतप्त चालकांनी पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. आंदोलक ट्रक चालकांनी यावेळी गाड्यांवर दगडफेक करत तोडफोड केली आहे.