मुलुंड परिसरात भरधाव दुचाकीनं महिला पोलिस अधिकाऱ्याला उडवलं !

197

Mumbai : मुलुंड परिसरात मंगळवारी मध्यरात्री एका भरधाव दुचाकीस्वाराने महिला पोलीस अधिकाऱ्याला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिला पोलिसाच्या नाकाला आणि तोंडाला मार लागला आहे.

याप्रकरणी दुचाकीस्वाराला अटक करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

अरविंद यादव असे अटक करण्यात आलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर, पूजा धाकतोडे असे जखमी झालेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पूजा धाकतोडे मुलुंड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला पोलीस अधिकारी मंगळवारी रात्री काही सहकाऱ्यांसह परिसरात गस्त घालण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीने त्यांना जोरधार धडक दिली. या दुचाकीवर तिघेजण होते.

या धडकेत महिला पोलिसांच्या नाकाला आणि तोंडाला मार लागला. मुलुंड पोलीस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांनी महिला अधिकाऱ्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे