ठाण्यात रेव्ह पार्टी उधळली; ठाणे पोलिसांची धडक कारवाई, १०० तरुणांना घेतलं ताब्यात. 

193

Thane : ठाणे पोलिसांनी नववर्षाच्या संध्येला मोठी धडक कारवाई करत एक रेव्ह पार्टी उधळून लावली आहे. या रेव्ह पार्टीत मद्यधुंद आणि नशेत धुंद असलेल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या पार्टीमध्ये पोलिसांनी धाड टाकून सुमारे १०० तरुणांना ताब्यात घेतले आहे. पार्टीत गांजा, चरस हे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

थर्टीफर्स्टनिमित्त ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली गावाच्या लगत रेव्ह पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. रेव्ह पार्टीतील सुमारे १०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे शाखा उपयुक्त शिवराज पाटील, एसीपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांच्याकडून संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली आहे.

थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात तरुणाई बेधुंद अवस्थेत पार्टीमध्ये सामील झाल्याचं दिसून आलं. एका खाजगी प्लॉटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये नशा करण्यासाठी विविध अंमली पदार्थांचा वापर होत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. एमडी, चरस, गांजा, अल्कोहोल असे विविध अंमली पदार्थ या पार्टीमध्ये पुरवण्यात आले होते. रेव्ह पार्टीत कारवाई केलेल्या सुमारे १०० जणांची चौकशी करण्यात येत असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. रेव्ह पार्टीत ताब्यात घेतलेल्या तरुणांना पोलिसांनी पंचनामा करून मेडिकलसाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात नेलं आहे.