#बेडग_लाँग_मार्च : साताऱ्यात रिपाई आक्रमक, महामार्ग रोखला..

169

सांगली जिल्ह्यातील ता. मिरज बेडग येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावची कमान पाडल्याच्या निषेधार्थ गावातील सर्व आंबेडकरी समाजाने मोर्चा काढला आहे. हा लाँग मार्च सांगली ते मुंबई असा आहे. शुक्रवारी हा मोर्चा साता-यात पोहोचला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) पक्षाच्या वतीने वाढे फाटानजीक रास्ता रोको करण्यात आला.

हा ‘लॉंग मार्च’ शुक्रवारी साताऱ्यात दाखल झाला. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज वाढेफाटा येथे उड्डाणपुलावर ‘रास्ता रोको’ करण्यात आला. यामुळे सुमारे तासभर वाहतूक विस्कळीत झाली.

बेडग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान पाडल्याच्या घटनेचे पश्चिम महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. या गावातील आंबेडकरप्रेमी अनुयायांनी आपली घरे बंद करून बेडग ते मुंबई असा ‘लॉंग मार्च’ आयोजित केला आहे.

रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुमारे तीनशे आंदोलक चालत पुण्याच्या दिशेने निघाले. वाढेफाटा येथील उड्डाण पुलावर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत निषेधाच्या घोषणा दिल्या आणि कमान पाडणाऱ्या मनुवादी प्रवृत्तींचा निषेध केला.

या आंदोलनात संघटनेचे उपाध्यक्ष प्रतीक गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष अण्णा वायदंडे, युवक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब गायकवाड, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष नीलेश गाडे आदी उपस्थित होते. हा साखळी मोर्चा पुणे, रायगड करत मुंबई मंत्रालयाकडे जाणार आहे.

या वेळी अशोक गायकवाड यांनी या प्रकरणातील मनुवादी प्रवृत्तींचा निषेध केला. या आंदोलनामुळे महामार्गावर सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती. साताऱ्याचे डीवायएसपी किरण सूर्यवंशी, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक अजित कोकाटे, पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, धनंजय फडतरे तसेच सुमारे शंभर ते दीडशे पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याने वळवण्यात आली. अर्ध्या तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर आंदोलक पुण्याच्या दिशेने रवाना झाले.