#बेडग_लाँग_मार्च भोर मध्ये दाखल; अजूनही सरकार कडून दखल नाहीच…

117

भोर (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील ता. मिरज बेडग येथील समस्त आंबेडकरी समाज पायी चालत मुंबई मंत्रालयाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. आज हा मार्च भोर येथे पोहचला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात येत असलेली स्वागत कमान बेकायशीर ठरवत ग्रामपंचायतीने पाडल्याच्या निषेधार्थ बेडग गावातील आंबेडकरी समाज मुंबईकडे रवाना झाला आहे. मात्र अजूनही राज्य सरकार अथवा प्रशासनाने ह्या मार्च ची कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळे समस्त राज्यभरातील आंबेडकरी समाजात असंतोष आहे.

ह्या लाँग मार्च मध्ये चिमुकल्यांसह वयोवृद्ध महिला, पुरुष देखील सहभागी झाले आहेत. आज हा लॉंग मार्च पुणे जिल्ह्यात दाखल झाला आहे. सारोळा या ठिकाणी भोर तालुक्यातील आंबेडकर समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना समर्थन जाहीर केले.

सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडग येथे दलित समाजाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान उभारण्यात येत होती. बेडग ग्रामपंचायतीने कमान बांधण्यासाठी परवानगी देखील दिली होती. मात्र, १६ जून रोजी कमान बेकादेशीर असल्याचे ठरवत, ग्रामपंचायतीने बांधकाम सुरू असलेली कमान पाडून टाकली. यानंतर जिल्ह्यातील आंबेडकर प्रेमींनी याला विरोध केला. त्यानंतर गावामध्ये ग्रामपंचायत विरुद्ध दलित समाज असा संघर्ष सुरू झाला. याच कारणास्तव बेडग येथील दलित समाजाने गाव सोडण्याचा निर्धार केला. घरांना कुलूप लावत, बॅगा भरुन सुमारे दीडशेहून अधिक कुटुंब या मार्चमध्ये सहभागी होऊन मुंबईच्या दिशेने पायी चालत निघाली आहेत.

दरम्यान, बांधकाम पाडल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कमान पाडणाऱ्या सरपंचासह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत बेडग ग्रामस्थांसह जिल्ह्यातल्या समस्त आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. प्रशासनाकडून सरपंच उमेश पाटील यांच्यासह संबंधितांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप ह्या आंबेडकरी समाजाचा आहे. ज्या गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कमान उभारु दिली जात नाही, त्याला विरोध होतोय आणि न्याय मिळत नाही, या भावनेतून बेडग ग्रामस्थांनी थेट गाव सोडण्याचा निर्धार केला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले.

मुंबईकडे निघालेला हा लॉंग मार्च आज पुणे जिल्ह्यात दाखल झाला. हे नागरिक मुलं-बाळं, जनावरं, संसारोपयोगी साहित्य घेऊन गाव सोडून मंत्रालयाकडे निघाले आहेत. बेडग गावातून दुसऱ्या गावात पुनर्वसन करावे, अशी मागणी देखील डॉ. बाबासाहेबांनी आंबेडकर स्वागत कमान बचाव कृती समितीने केली आहे.

या वेळी दलीत पँथरचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष विनोद गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे भोर तालुका युवक अध्यक्ष स्वप्निल गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे भोर तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड, भीम आर्मीचे भोर तालुका अध्यक्ष महिंद्र साळुंके, भारतीय बौद्ध महासभेचे भोर तालुका अध्यक्ष रामभाऊ रणखांबे आदी उपस्थित होते.